'या' गावात आंघोळीसाठी ग्रामपंचायत देते मोफत गरम पाणी; संपूर्ण जिल्ह्यात उपक्रमाची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2022 03:10 PM2022-11-14T15:10:48+5:302022-11-14T15:49:01+5:30

पर्यावरण संवर्धन; सोलर पॅनलचा प्रभावी वापर

Gram panchayat provides free hot water for bathing in Rengepar village of bhandara dist | 'या' गावात आंघोळीसाठी ग्रामपंचायत देते मोफत गरम पाणी; संपूर्ण जिल्ह्यात उपक्रमाची चर्चा

'या' गावात आंघोळीसाठी ग्रामपंचायत देते मोफत गरम पाणी; संपूर्ण जिल्ह्यात उपक्रमाची चर्चा

Next

चंदन मोटघरे

लाखनी (भंडारा) : संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात राज्यातून प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळविणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील रेंगेपार (कोहळी) गावाने आता वृक्षतोड थांबविण्यासाठी पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम हाती घेतला. हिवाळ्याच्या दिवसात सकाळी ६ वाजल्यापासून गावकऱ्यांना मोफत गरम पाणी पुरविले जात आहे. आठवड्याभरापूर्वी सुरू केलेल्या या उपक्रमाचा लाभ गावातील १२० कुटुंब घेत असून संपूर्ण जिल्ह्यात या उपक्रमाची चर्चा आहे.

लाखनी तालुक्यातील रेंगेपार ग्रामपंचायत नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात अग्रेसर असते. ग्रामपंचायतीला २०११ मध्ये संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाचे राज्यातून पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले होते. तसेच, स्मारक ग्राम योजनेचे बक्षीसही मिळाले आहे. पर्यावरण संवर्धनासाठी ग्रामपंचायतीच्या मालकीच्या १०० एकर परिसरात वृक्ष लागवड केली आहे. थंडीच्या दिवसात पाणी गरम करण्यासाठी अतिरिक्त सरपण लागतो. त्यासाठी वृक्षतोड होऊ नये म्हणून आता ग्रामपंचायतीने नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. सरपंच मनोहर बोरकर यांच्या पुढाकाराने सोलर वॉटर हिटर सयंत्र लावण्यात आले आहे. त्यासाठी दोन लाख ९८ हजार रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती ग्रामसेवक एच.व्ही. लंजे यांनी दिली.

गावासाठी एकच सौर हीटर

  • दीड हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी येथे आहे. सोलर पॅनलद्वारे पाणी गरम होते. सकाळी ६ वाजल्यापासून १२० कुटुंबाना गरम पाणी मोफत दिले जाते. यासाठी कोणताही मोबदला घेतला जात नाही.
  • गृहकर व पाणीपट्टी करातून याचा खर्च भागविला जात आहे. रेंगेपार कोहळी गावाची लोकसंख्या १८७९ असून १२० कुटुंब येथे राहतात. संपूर्ण गावकऱ्यांचा या उपक्रमात सहभाग आहे.

सकाळपासून गरम पाण्यासाठी गर्दी

गरम पाणी तेही मोफत मिळत असल्याने सकाळपासूनच रेंगेपार येथील नागरिकांची गर्दी होते. ग्रामपंचायतीच्या परिसरात लावलेल्या या सयंत्रातून गरम पाणी नेण्यासाठी महिला पुरुष गर्दी करून असतात. सकाळी ६ ते १० असे चार तास गरम पाणी दिले जाते.

गावकऱ्यांना नळ योजनेद्वारे मुबलक पाणी दिले जाते. गरम पाणी पुरविण्याची कल्पना त्यातूनच आली. पर्यावरण संरक्षणाचा विचार करून सौर उर्जेद्वारे गरम पाणी गावकऱ्यांना दिले जाते. सकाळी आंघोळ करून ग्रामस्थांनी आपल्या कामाला निघावे. हा यामागचा उद्देश आहे.

मनोहर बोरकर, सरपंच रेंगेपार कोहळी

Web Title: Gram panchayat provides free hot water for bathing in Rengepar village of bhandara dist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.