ग्रामपंचायत शिवनी, बेलाचा मुंबईत गौरव
By admin | Published: June 2, 2017 12:26 AM2017-06-02T00:26:07+5:302017-06-02T00:26:07+5:30
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात सन २०१६-१७ मध्ये स्वच्छतेबाबद उल्लेखनिय कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामपंचायत शिवनी
सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान : महानायक अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत कार्यक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात सन २०१६-१७ मध्ये स्वच्छतेबाबद उल्लेखनिय कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामपंचायत शिवनी व बेला यांचा मुंबईत सत्कार करण्यात आला. महानायक अमिताभ बच्चन व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार सोहळा पार पडला.
या कार्यक्रमालाच राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, प्रधान सचिव राजेशकुमार, जलस्वराजचे राघवन, वासो चे संचालक सतीश उमरीकर, आईसी सल्लागार कुमार खेळकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात सन २०१६-१७ यावर्षात भंडारा जिल्ह्यातील लाखनी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या शिवनी व भंडारा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बेला ग्रामपंचायतीने उल्लेखनिय कार्य करुन गावाला स्वच्छ, सुंदर व आदर्श बनविण्यासाठी लोक सहभागातून पुढाकार घेतला. दोन्ही ग्रामपंचायती स्वच्छतेसाठी प्रेरणादायी ठरले आहे.
शिवनी व बेला या दोन्ही ग्रामपंचायतीत जिल्हास्तरावर सन्मानित झाल्या आहेत. या दोन्ही ग्रामपंचायतींना केंद्र व राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे गौरविण्यात आला. या कार्यक्रमाला भंडारा जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता), सुधाकर आडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. शिवनी ग्रामपंचायतीचा पुरस्कार सरपंच माया कुथे, सचिव जयंत गडपायले, मोहन कुथे यांनी स्विकारला. तर बेला ग्रामपंचायतीचा पुरस्कार सरपंच शारदा गायधने, सचिव कृष्णकुमार नागपूरे, उपसरपंच अर्चना कांबळे यांनी स्विकारला. जिल्ह्यात अव्वल ठरुन राज्यात आपली छाप सोडणाऱ्या या ग्रामपंचायतींना राज्यात पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाचा माझा महाराष्ट्र, स्वच्छ महाराष्ट्रचा सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले. ग्रामपंचायत शिवनी व बेला ने केलेल्या कार्याची दखल केंद्र व राज्य सरकारने घेतल्याने जिल्ह्यासाठी ही गौरवाची बाब आहे.