शाळांची घंटा वाजणार ग्रामपंचायत, पालकांच्या एनओसीनंतरच....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:24 AM2021-07-11T04:24:08+5:302021-07-11T04:24:08+5:30
भंडारा : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दीड वर्षापासून शाळा, महाविद्यालये सर्वच बंद आहेत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. यंदा नवीन ...
भंडारा : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दीड वर्षापासून शाळा, महाविद्यालये सर्वच बंद आहेत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. यंदा नवीन शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली असली तरी अद्यापही विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली नाही.
त्यामुळे ऑनलाईनवर शाळांचा डोलारा सुरू आहे. मात्र, आता कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे आटोक्यात आला आहे. त्यामुळे येत्या १५ जुलैपासून इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यासाठी कोरोनामुक्त गावांना प्राधान्य देण्यात आले. शाळा सुरू करण्यासाठी शाळांचा ठराव आणि पालकांचे संमतीपत्र मिळाल्यावर शाळा सुरू करण्यात येणार आहे. यासाठी गाव स्तरावर सरपंच, ग्रामसेवक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, तालुका आरोग्य अधिकारी, मुख्याध्यापक यांचा समावेश असलेल्या सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून गावस्तरावर निर्णय घेऊन तसा प्रस्ताव जि. प. शिक्षण विभागाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर १५ जुलैपासून इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू केले जाणार आहे. त्यासाठी जि. प. शिक्षण विभागाने तयारी सुरू केली आहे.
बॉक्स
ग्रामपंचायतींचा ठराव नाही
शासन आदेशानंतर शिक्षण विभागाने शाळांमार्फत ग्रामपंचायतीना पत्र पाठवून कोरोनामुक्त गावात शाळा सुरू करण्यासंदर्भात ठराव घेण्याचे कळविले आहे. ग्रामपंचायतीचा ठराव झाल्यानंतर त्या गावात शाळा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. सध्या जिल्ह्यात कोणत्याच ग्रामपंचायतीने असा ठराव घेतला नसला तरी काही गावात तयारी सुरू करण्यात आली आहे.
बॉक्स
शाळांना आहे आदेशाची प्रतीक्षा
जिल्ह्यातील सर्वच गावातील शाळा सज्ज आहेत. शाळा प्रशासनाला केवळ शासन आदेशाची प्रतीक्षा आहे. काही शिक्षक शाळेत जात असून ऑनलाईनच्या माध्यमातून अभ्यासक्रम सुरू केला आहे. मात्र विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी परवानगी नाही शिक्षक जमेल त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
कोट
कोरोना संकट आता कमी झाले आहे. त्यामुळे गावातील शाळा तसेच शहरातील काही वर्ग सोशल डिस्टन्सचे नियम पाळून सुरू करण्यास काहीच हरकत नाही. शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थी, पालक तसेच शिक्षकांनाही ताण आला आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याची चिंता सतावत आहे.
- असनद, पालक.