अड्याळ नगरपंचायतीत समाविष्ट होण्यास ग्रामपंचायतींचा नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 01:47 PM2024-08-01T13:47:00+5:302024-08-01T13:47:28+5:30
पाठविला प्रस्ताव : अड्याळ नगरपंचायत होणार की नाही ?
विशाल रणदिवे
लोकमत न्यूज नेटवर्क
अड्याळ : अड्याळ ग्रामपंचायत हद्दवाढ संदर्भात नेरला, सोंदळ, सुरबोडी, सालेवाडा, केसलापुरी व चकारा या गावांना समाविष्ट करून अड्याळ नगरपंचायत करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता; मात्र या सहाही ग्रामपंचायतींनी अड्याळमध्ये सहभागी होण्यासाठी स्पष्ट नकार दिला आहे. पहिल्या टप्प्यात ग्रामपंचायतीच्या नकारघंटेमुळे अड्याळ नगरपंचायत होणार की नाही? याची उत्सुकता व चर्चा रंगली आहे.
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ३४१ अ मधील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी भंडारा यांनी सन २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या, ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील अकृषक रोजगाराची टक्केवारी, ग्रामपंचायतींचा नगरपंचायतीमध्ये रूपांतर करण्याबाबतचा ग्रामपंचायतींचा ठराव, गट किंवा सर्व्हे नंबर दर्शवणारी अनुसूची 'अ' व 'ब', नागरीकरणाचे सर्व्हे क्रमांक, गावठाण क्षेत्र, अकृषिक असलेले क्रमांक यासह अन्य आवश्यक बाबींच्या पूर्ततेसह प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला सादर करावयाचा होता.
याबाबत आमदार नरेंद्र भोडेकर यांनी अड्याळ ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर करण्याबाबतची मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे केली होती. यावर जिल्हा प्रशासनाने मागितलेल्या प्रस्तावासंदर्भात अड्याळलगतच्या सहा ग्रामपंचायतींनी विलीन होण्यास नकार दर्शविला. नगरविकास विभाग मंत्रालयाच्या अवर सचिवांकडून आलेल्या पत्रात जिल्ह्यातील अड्याळ नगरपंचायत स्थापन करणे बाबतचा प्रस्ताव शासनास प्राप्त झाल्याचे म्हटले होते. त्यामधील अड्याळ, नेरला व सौंदड या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील संपूर्ण सर्व्हे क्रमांकाची यादी अनुसूची 'अ' तसेच या तीन ग्रामपंचायतीच्या सीमेलगत असलेल्या सर्व्हे क्रमांकाची यादी अनुसूची "ब" तत्काळ शासनास सादर करावी असा स्पष्ट उल्लेख केला आहे. भविष्यात या सहा ग्रामपंचायती तयार होऊन अड्याळ नगरपंचायतीत सहभागी होणार काय? याकडे समस्त ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.
तर सुविधा मिळणार काय?
अड्याळ गावात इतर सहा गावांचा समावेश करून नगरपंचायत स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहेत; मात्र सद्यःस्थितीत एकच ग्रामपंचायत असताना नागरिकांना शुद्ध पाणी व इतर मूलभूत सुविधांची कमतरता जाणवते. नगर पंचायत झाल्यावर गावाचा विस्तार वाढेल तर खरंच सुविधाही मिळणार काय ? असा सवाल व चर्चाही गावात सुरू आहे.