ग्रामसेवक वैद्य निलंबीत; भरले ३१ लाख, मात्र गुन्हा दाखल केव्हा?
By युवराज गोमास | Published: December 9, 2023 06:39 PM2023-12-09T18:39:03+5:302023-12-09T18:40:11+5:30
देव्हाडा ग्रामपंचायतीचे प्रकरण : गुन्हा दाखल करण्यात पोलिसांकडून दिरंगाई
युवराज गोमासे, भंडारा : सरपंचाची बनावट स्वाक्षरी करून ग्रामसेवक राकेश वैद्य याने ३१ लाख ८९ हजार ६०० रूपये बँकेतून काढल्याप्रकरणी चौकशीअंती सिईओंनी शुक्रवार ८ डिसेंबरला ग्रामसेवकास निलंबीत केले. तर गुरूवारपर्यंत ग्रामसेवकाने देव्हाडा व तुमसर येथील बॅकेत काढलेली रक्कम भरली. प्रकरणी खंड विकास अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकाची करडी पोलिसात तक्रार दाखल केली. परंतु, दोन दिवस लोटूनही गुन्हा दाखल करण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून दिरंगाई होत आहे.
ग्रामसेवक राकेश वैद्य याचेकडे देव्हाडा व खडकी ग्रामपंचायतीचे कामकाज होते. २०२२ ते २०२३ दरम्यान ग्रामसेवकाने सामान्य फंड, पाणी पुरवठा व दलीत वस्ती फंडातून सुमारे ३१ लाख ८९ हजार ६०० रूपये अवैधरित्या काढले. यासाठी त्याने तत्कालीन सरपंच भारती कांबळे, प्रभारी उपसरपंच भाऊराव लाळे यांच्या बनावट स्वाक्षऱ्या केल्याची तक्रार जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी, खंड विकास अधिकारी यांचेकडे करण्यात आली.
प्रकरणी पंचायत विस्तार अधिकारी भिमगिरी बोदेले यांनी ४ डिसेंबर रोजी चौकशी केली असता ग्रामसेवकाने गुन्हा कबूल केला. ऑनलाइन जुगारात पैसे गमावल्याचे सांगितले. प्रकरणी सर्व रक्कम परत करण्याचे लेखी पत्रही चौकशी अधिकाऱ्याकडे दिले. दलीत वस्ती योजनेचा पैसे हडपण्यासाठी २०२१ पासून सरपंच व ग्रामसेवकाचे नावे जाणीवपूर्वक खाते ठेवले. यामध्येही कर्तव्यात कसूर केला. प्रकरण अंगलट येण्यासाठी शक्यता दिसून येताच ग्रामसेवकाने ७ डिसेंबरपर्यंत अफरातफर केलेली रक्कम बँकेत जमा केली.
पैसे जमा होताच मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी ग्रामसेवक राकेश वैद्य यास निलंबीत केले. तर खंड विकास अधिकारी यांनी करडी पोलिसात तक्रार दाखल केली. करडी पोलिसांनी प्रकरणी वरिष्ठांचे मार्गदर्शन मागितले. परंतु, दोन दिवस लोटले असतांना पोलिसांनी गुन्हा दाखलची कारवाई झाली नव्हती.
तारखेनिहाय जमा झालेली रक्कम
ग्रामसेवक राकेश वैद्य याने ४ डिसेंबर रोजी युनियन बँक शाखा तुमसर येथील बँक खात्यातील सामान्य फंडात ९ लाख रूपये जमा केले. ६ डिसेेंबरला सामान्य फंड खात्यात ४ लाख, दलीत वस्ती खाते १ लाख, पाणी पुरवठा खाते ५० हजार. ही सर्व रक्कम भंडारा डिस्ट्रीक्ट को ॲाफ बँक शाखा देव्हाडा शाखेत जमा केली. त्याच दिवशी तुमसर येथील युनियन बँक खात्यात ५ लाख, ५० हजार रूपये जमा केले. ७ डिसेंबर रोजी भंडारा डिस्ट्रीक्ट को ॲाफ बँक शाखा तुमसर येथील सामान्य फंड खात्यात ११ लाख रूपये, याप्रमाणे ३१ लाख रूपये जमा केले.
ग्रामसेवक वैद्य याने दलीत वस्ती फंड खाते ग्रामसेवक व सरपंच यांचे नावे ठेवून कर्तव्यात कसूर केला. विविध खात्यातून सरपंचांची बनावट स्वाक्षरी करून पैसे उचलले. प्रकरणी चौकशी अहवाल प्राप्त होताच करडी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. ८ डिसेंबर रोजी सिईओंनी ग्रामसेवक वैद्य यास निलंबीत केले आहे. पंचायत समिती लाखनी येथे हलविण्यात आले आहे. - पल्लवी वाडेकर, खंड विकास अधिकारी, मोहाडी.