ग्रामसेवक, शिक्षकांचा ग्रामसभेवर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 11:01 PM2018-01-24T23:01:11+5:302018-01-24T23:02:07+5:30
आॅनलाईन लोकमत
भंडारा : शासकीय सुट्टीच्या दिवशी ग्रामसभा घेऊ नये. शासकीय सुट्टी असल्याने यादिवशी कर्मचाऱ्यांना ग्रामसभेचे काम न देता अन्य कार्यालयीन कामाच्या दिवशी या सभा बोलवाव्या, अशी मागणी करून २६ जानेवारीला होणाऱ्या ग्रामसभेवर जिल्ह्यातील ग्रामसेवक व शिक्षक बहिष्कार घालीत असल्याचे निवेदन मुख्य कार्यपालन अधिकारी यांना देण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन व अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने हे निवेदन जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकारी यांना देऊन ग्रामसभेवर बहिष्कार टाकणार असल्याची पुर्वकल्पना दिली आहे.
ग्रामसेवक युनियन
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष दिगांबर गभने, सरचिटणीस जयेश वेदी, राज्यसंघटक विलास खोब्रागडे यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्यदिन, महात्मा गांधी जयंती यादिवशी गावागावांमध्ये ग्रामसभा घेण्याचे शासनाचे निर्देश आहे.
मात्र सार्वजनिक सुट्टी असल्याने ग्रामसभेला ग्रामसेवक वगळता अन्य कुठल्याही विभागाचे कर्मचारी उपस्थित राहत नाही. त्यामुळे वेळप्रसंगी वातावरण तापून दप्तरांची पळवापळवी व ग्रामसेवकांना दमदाटीचा प्रकार यापुर्वी घडला असल्याने २६ जानेवारीला होणाऱ्या ग्रामसभा रद्द कराव्या अन्यथा ग्रामसेवकांकडून यावर बहिष्कार टाकण्याचा इशारा या निवेदनातून दिला आहे.
प्राथमिक शिक्षक संघ
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त गावात होणाऱ्या ग्रामसभेतून विकासाचे कामे, विकास आराखडा आदींची अंमलबजावणी करण्यात येते. मात्र यापूर्वी ग्रामसेवकांवर घडलेल्या घटनेमुळे यावर्षी ग्रामसेवकांनी बहिष्कार घातला आहे. याशिवाय शिक्षण हक्क कायदा २००९ मधील तरतुदीनुसार व आरटीईनुसार शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नये, अशा शासनाच्या सुचना आहेत. त्यामुळे २६ जानेवारीला जिल्ह्यात होवू घातलेल्या ग्रामसभावर अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने बहिष्कार घालण्यात येत असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकारी यांना देण्यात आले आहे.
जिल्हाध्यक्ष रमेश सिंगनजुडे, केशव बुरडे यांच्या नेतृत्वात ज्ञानेश्वर दमाहे, नरेश कोल्हे, अशोक ठाकरे, विजय चाचीरे, केशव अतकरी, कैलास चव्हाण, जे.एम. पटोले, नेपाल तुरकर, बी.जी. भुते, किशोर ईश्वरकर, रमेश फटे, अरुण बघेले, यशपाल बघमारे, सुरेश कोरे, रवि उगलमुगले, नरेंद्र रामटेके आदी उपस्थित होते.