वाहनांच्या प्लेटवरून 'दादा, भाऊ' निघेनात

By admin | Published: February 4, 2016 12:46 AM2016-02-04T00:46:28+5:302016-02-04T00:46:28+5:30

गाड्यांच्या नंबर प्लेटवर 'दादा', 'बाबा', 'भाई' यांसारखी अक्षरे दिसणारे आकडे लावणाऱ्या तसेच फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱ्यांवर कडक कारवाई ...

'Grandfather, brother' on the plate of the vehicle | वाहनांच्या प्लेटवरून 'दादा, भाऊ' निघेनात

वाहनांच्या प्लेटवरून 'दादा, भाऊ' निघेनात

Next

परिवहन विभागाचे दुर्लक्ष : न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली
भंडारा : गाड्यांच्या नंबर प्लेटवर 'दादा', 'बाबा', 'भाई' यांसारखी अक्षरे दिसणारे आकडे लावणाऱ्या तसेच फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकार, आरटीओ आणि वाहतूक पोलिसांना नोटीस बजावली आहे; मात्र नोटीस बजावल्यानंतर आरटीओ, पोलिसांकडून गेल्या वर्षभराच्या कालावधीत कोणतीच उपाय योजना करण्यात आली नाही. त्यामुळे नंबर प्लेटवरील दादा, भाऊ, मोदी, पाटील 'जैसे थे' असल्याचे चित्र आहे.
मोटार वाहन कायद्यातील तरतुदींनुसार, फॅन्सी नंबर प्लेट लावणे गुन्हा ठरतो; परंतु शहरातील बहुतांश चारचाकी वाहनांवर दादा, बाबा, भाऊ, नमो, करण, पवन, पाटील, मराठा, आणि इतरही नावसदृश नंबर प्लेट आढळून येतात. इतकेच काय तर पोलीस ठाणे आणि जिल्हा न्यायालय परिसरातही अशाप्रकारच्या नंबर प्लेट असणाऱ्या गाड्या पार्क केलेल्या आढळतात.
दरम्यान, केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यात दुरुस्ती केली. त्यानुसार नंबर प्लेट या इंग्रजी अरोबिक फॉन्टमध्येच असाव्यात, असे अधिसूचित केले आहे. त्याशिवाय हिंदी, मराठी, गुजराती, पंजाबी व इतरही भारतीय भाषांमधील नंबर प्लेटवर बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतरही भारतीय भाषांमधील नंबर प्लेटचा सर्रास वापर होत असल्याचे चित्र आहे. केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यातील दुरुस्तीला देशभरातील विविध राज्यांनी अंमलात आणले आहे; परंतु महाराष्ट्र सरकारने अद्याप दुरुस्ती लागू केलेली नाही. केंद्रीय कायद्यातील तरतुदींचे पालन व्हावे म्हणून सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने सर्वच राज्य सरकारांना सुधारित नियम लागू करण्याचे निर्देश दिलेले आहेत, मात्र उच्च न्यायालयाच्या या निर्देशाकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. कारवाई होत नसल्यामुळे शहरात फॅन्सी नंबरप्लेट लावणाऱ्यांमध्ये स्पर्धाच लागली असल्याचे चित्र आहे.
वाहनांवरील नंबर प्लेटवर काही तरी अक्षर तयार करून आपण इतरापेक्षा नक्कीच वेगळे आहोत, असा प्रयत्न होत असल्याचा शहरात दृष्टीस पडत असलेल्या वाहनांच्या नंबर प्लेटवरून दिसून येत आहे. विविध राजकीय पुढाऱ्यांसह तरुण आणि सुशिक्षित नागरिकही आपल्या वाहनांवर आकर्षक नंबर प्लेट लावत असल्याचे सर्वत्र दृष्टीस पडते. न्यायालय आवार आणि पोलीस ठाण्यातही आकर्षक नंबर प्लेटची वाहने उभी केली जातात, याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष आहे.

Web Title: 'Grandfather, brother' on the plate of the vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.