टिप्परखाली आल्याने दुचाकीस्वार आजोबासह नातीन ठार, चालकाविरुद्ध गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 06:29 PM2023-03-25T18:29:16+5:302023-03-25T18:31:51+5:30
भंडाराच्या नागपूर नाक्यावरील घटना
देवानंद नंदेश्वर
भंडारा : शाळेतून सुटी झाल्यानंतर चार वर्षीय नातीनसह मोपेडने स्वगृही जात असताना टिप्परखाली आल्याने दुचाकस्वार आजोबासह नातीनचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी, दुपारी १.१० वाजताच्या सुमारास भंडारा शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील नागपूर नाक्यानजीक घडली.
कवळू बडवाईक (७३) व वाणी महेंद्र बडवाईक (४), दोन्ही रा. पिंडकेपार (पुनर्वसन) असे मृत आजोबा-नातीनचे नाव आहे.माहितीनुसार, वाणी बडवाईक ही चिमुकली भंडारा येथील गायत्री विद्या मंदिरातील कान्व्हेन्टची विद्यार्थीनी आहे. शनिवारी सुटी झाल्यानंतर आजाेबा कवळू बडबाईक नातीला आणण्यासाठी शाळेत आले होते. मोपेड (एम.एच.३६ टी ३७५३) ने नातीला घेऊन स्वगृही जात असताना नागपूर नाक्यानजीक दुचाकीवरून तोल गेल्याने टिप्पर (एमएच ४९-०७०१) च्या चाकाखाली आले. यात महेंद्र बडबाईक यांचा जागीच मृत्यू झाला. जखमी वाणी हिला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी भंडारा पोलिसांनी टिप्पर चालकाविरुद्ध भादंवि २७९, ३०४ (अ), मोटार वाहन कायद्याच्या १८४ कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरिक्षक सुशांत पाटील करीत आहेत.