आजीचे अस्थी विसर्जन करायला गेलेल्या नातवाचा नदीत बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2022 12:29 PM2022-06-14T12:29:08+5:302022-06-14T13:05:54+5:30
विसर्जन झाल्यानंतर नदीपात्रात आंघोळीसाठी प्रशांत पोहत खोल पाण्यात गेला. मात्र, काही अंतरावर गेल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने तिथेच बुडाला.
पवनी (भंडारा) : आजीच्या अस्थी विसर्जनासाठी आलेल्या एका तरुणाचा येथील वैनगंगा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी १० वाजताच्या सुमारास घडली. मृत तरुण चंद्रपूर जिल्ह्यातील आंबोली येथील रहिवासी होता.
प्रशांत धोंडबा ठाकरे(२५) असे या मृत तरुणाचे नाव असून तो शेती करत होता. प्रशांत ठाकरे यांच्या घरी त्यांची आजी मैना पोटे या राहत होत्या. वृद्धापकाळाने त्यांचे रविवारी निधन झाले. अंत्यविधी आंबोली येथेच करण्यात आला. दुसऱ्या दिवशी ठाकरे परिवार अस्थी विसर्जनासाठी पवनी येथील वैनगंगा नदीपात्रावर आले. विसर्जन झाल्यानंतर नदीपात्रात आंघोळीसाठी प्रशांत पोहत खोल पाण्यात गेला. मात्र, काही अंतरावर गेल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने तिथेच बुडाला.
ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली. तेव्हा परिसरातील नागरिक धावून आले. नावाड्याच्या मदतीने त्याचा शोध घेतला. बराच वेळानंतर त्याचा मृतदेह गवसला. या घटनेची माहिती पवनी पोलिसांना देताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना करण्यात आला. ठाणेदार जगदीश गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा तपास पोलीस नायक संतोष चव्हाण करीत आहे.
अर्ध्यावरती डाव मोडला
मृतक प्रशांत ठाकरे याचे फेब्रुवारी २०२२ला लग्न झाले होते. त्याची पत्नी आता गरोदर आहे. अशातच प्रशांतचा असा अकाली मृत्यू झाल्यामुळे गावात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे.