प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचे अनुदान रखडले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 11:52 AM2024-09-18T11:52:20+5:302024-09-18T11:53:11+5:30

५-६ हजारांचे अनुदान : टोल फ्रीवर कुणाशीच होत नाही संपर्क

Grant of Pradhan Mantri Matru Vandana Yojana stopped | प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचे अनुदान रखडले

Grant of Pradhan Mantri Matru Vandana Yojana stopped

लोकमत न्यूज नेटवर्क 
तुमसर :
गरोदर व अर्भक सुदृढ राहावा, या उद्देशाने शासनाने प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना सुरू केली, परंतु तुमसर शहर परिसरात मातांच्या मोठ्या प्रमाणात नोंदी होऊनही या योजनेचा लाभ मिळाला नाही. या योजनेचे अनुदान रखडले असून, टोल फ्री क्रमांकावर संपर्क होत नाही. अनुदान मिळण्यासाठी किती कालावधी लागेल असे सांगता येत नाही, असे लिखित उत्तर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिले आहे. त्यामुळे या योजनेच्या यशस्वीतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.


केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेंतर्गत गरोदर व स्तनदा मातेला पहिल्या जीवित अपत्यासाठी पाच हजार रुपये, पहिला टप्पा तीन हजार शासनमान्य आरोग्य संस्थेमध्ये नोंदणी केल्यानंतर १५० दिवसांच्या आत पोर्टलला नोंदणी करणे आवश्यक असते. दुसरा टप्पा दोन हजार रुपये बाळाला १४ आठवड्यांचे लसीकरण पूर्ण केल्यानंतर व दुसरे जीवित अपत्य फक्त मुलीसाठी सहा हजार रुपये एकाच टप्प्यांमध्ये बाळाला १४ आठवड्यांचे लसीकरण पूर्ण केले. त्यानंतर आरोग्याची काळजी घेण्याकरिता आर्थिक लाभ लाभार्थीच्या आधार बेस बँक खात्यात केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार डीबीटीद्वारे जमा केला जातो.


लाभार्थी नोंदणी पीएमव्हीवाय पोर्टलला त्यांच्या कार्यक्षेत्रातील लॉगिन वरून करण्यात येते. इतर तांत्रिक सोपस्कार पार पाडावे लागतात. सदर लाभार्थी पडताळणी झाल्यानंतर लाभार्थीचे ऑनलाइन फॉर्मला मंजुरी देणे, तसेच पेमेंट जनरेट करण्याचे किंवा नामंजूर करण्याचे अधिकार तालुका आरोग्य अधिकारी यांना केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मिळाले आहे.


डीएचओ म्हणतात, टोल फ्री क्रमांकावर संपर्क करा 
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतील लाभार्थीनी केलेल्या अर्जाची संपूर्ण प्रक्रिया अंगणवाडी सेविका आरोग्य सेविका व तालुका स्तरावरून वेळेमध्ये करणे गरजेचे आहे. याबाबत अधिक माहिती हेल्पलाइन नंबर या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले. अनुदान मिळण्यास किती कालावधी लागेल याबाबत निश्चित सांगता येत नाही, असेही एका पत्रात जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी नमूद केले आहे. त्यामुळे येथील मातृत्व वंदना योजनेतील शेकडो लाभार्थीना किती काळ प्रतीक्षा करावी लागेल, असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे.

Web Title: Grant of Pradhan Mantri Matru Vandana Yojana stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.