पाच वर्षांपासून निधी मंजूर, तरीही बांधकामाचा मुहूर्त नाही !
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 12:57 PM2024-05-16T12:57:25+5:302024-05-16T12:57:57+5:30
लाखनी ग्रामीण रुग्णालयातील प्रकार : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : येथील ग्रामीण रुग्णालयातील औषधी भांडार कक्षासाठी २०१९ मध्ये ३६ लाख रुपयांचे बांधकाम मंजूर करण्यात आले होते. मात्र, पाच वर्षांचा कालावधी उलटूनही या कक्षाच्या बांधकामाचा अजूनपर्यंत पत्ता नाही. त्यामुळे औषधी न भांडार कक्षाचे बांधकाम होणार की नाही, असा संभ्रम निर्माण झाला असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ज्या जागेत हे बांधकाम होणार आहे, तिथे खड्डे मात्र खोदून आहेत.
या तालुक्याची निर्मिती झाल्यापासून येथे असलेल्या रुग्णालयाला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला. येथे असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र केसलवाडा येथे स्थानांतरित करण्यात आले. मात्र ग्रामीण रुग्णालयात सोयी व सुविधांचा अजूनही अभाव आहे. येथे ग्रामीण रुग्णालयाची प्रशस्त इमारत तर आहे, मात्र औषधी भांडार कक्ष नाही. परिणामतः औषधांचा साठा वॉर्डात करावा लागत आहे. ही अडचण लक्षात घेऊन औषधी भांडार कक्षाच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. लाखनी हे तालुक्याचे ठिकाण असून, तालुक्यातील नागरिक दैनंदिन कामासाठी व औषधोपचारासाठी दाखल होतात. मात्र, नागरिकांना योग्य त्या सोयी रुग्णालय प्रशासनाकडून मिळत नाहीत. परिणामतः नागरिकांना खासगी रुग्णालयाचा मार्ग स्वीकारावा लागतो. खासगी रुग्णालयाची सेवा गरिबांच्या खिशाला परवडणारी नाही. येथे ग्रामीण रुग्णालय तर आहे, परंतु तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे नागरिकांना रेफर टू भंडारा केले जाते.
वाढीव प्रसूतिगृहाचे बांधकाम सदोष
रुग्णालयातील वाढीव प्रसूतिगृहाच्या बांधकामावर कोट्यवधी रुपये खर्च झाले. मात्र, इमारतीला गळती होत असल्यामुळे बांधकाम सदोष असल्याचे दिसून येत आहे. कंत्राटदाराने साहित्याचा अत्यल्प वापर केल्यामुळे हे बांधकाम सदोष
आहे, असे बांधकाम क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. सदोष बांधकाम करणारे कंत्राटदार, त्यावर देखरेख करणारे अभियंते यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे.
३० खाटांचे रुग्णालय २० खाटांवर
या ग्रामीण रुग्णालयाला ३० खाटांची परवानगी आहे. असे असले तरी सध्या एका वॉर्डात औषधी ठेवण्यात आल्यामुळे २० खाटा कार्यान्वित आहेत. त्यामध्ये एक जनरल वॉर्ड व दुसरे महिलांकरिता वॉर्ड ठेवण्यात आले आहेत.
ग्रामीण रुग्णालयात तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाचे बांधकाम
लाखनी येथील पंचायत समिती कार्यालयात तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय आहे. ते अपुऱ्या जागेत असल्याने ग्रामीण रुग्णालय परिसरात नव्याने तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय बांधकाम जोमात सुरू आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात हे बांधकाम करू नये, असा पत्रव्यवहार येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी कार्यकारी अभियंता तसेच वरिष्ठांना केला होता. मात्र, जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सकांनी त्या पत्राला केराची टोपी दाखविली. परिणामतः काम सुरूच आहे.