गणेशपूर उपसासिंचन प्रकल्पाला हिरवी झेंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:42 AM2021-09-08T04:42:17+5:302021-09-08T04:42:17+5:30
मोहन भोयर तुमसर : ‘धरण उशाला अन् कोरड घशाला’ असा प्रकार गत काही वर्षांपासून तुमसर तालुक्यातील बारागावांच्या संदर्भात सुरू ...
मोहन भोयर
तुमसर : ‘धरण उशाला अन् कोरड घशाला’ असा प्रकार गत काही वर्षांपासून तुमसर तालुक्यातील बारागावांच्या संदर्भात सुरू होता. या बारा गावांना सिंचनाची सोय व्हावी म्हणून मंत्रालयात बैठक घेण्यात आली. त्यात गणेशपूर उपसा सिंचन प्रकल्पाला हिरवी झेंडी मिळाली असून, बावनथडी प्रकल्पातून पाण्याचा उपसा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे सिंचनातून समृद्धीचे स्वप्न साकार होणार आहे.
तुमसर तालुक्यात आंतरराज्य बावनथडी प्रकल्प आहे; परंतु प्रकल्प स्थळापासून आठ ते दहा किलोमीटर अंतरावरील बारा गावांना सिंचनाचा लाभ होत नव्हता. त्यामुळे या परिसरात दरवर्षी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. बावनथडी प्रकल्पाच्या वितरिका गणेशपूर व येदरबुची परिसरात तयार करण्यात आल्या होत्या; परंतु बावनथडी प्रकल्पाचे पाणी येथे पोहोचत नव्हते. हा संपूर्ण परिसर उंचावर असल्याचे सांगण्यात येते. वितरिका बांधकामासाठी कोट्यवधींचा खर्च करण्यात आला होता; परंतु त्या वितरिका पाण्यावाचून कोरड्या पडल्या होत्या.
गणेशपूर उपसा सिंचन प्रकल्प येथे अस्तित्वात आल्यास गोबरवाही परिसरातील गणेशपूर, पवनारखारी, येदरबुची, सुंदरटोला, सीतासावांगी, खंदाड, गुडरी, धामणे वाडा, सौदेपूर, गोबरवाही, हेटीटोला या गावांना सिंचनाच्या लाभ होणार आहे. या परिसरात गणेशपूर येथे सिंचन विभागाचा तलाव, तर येदरबुची येथे जिल्हा परिषदेचा तलाव आहे. या तलावापर्यंत वितरिका बांधकाम करण्यात आले; परंतु बावनथडी प्रकल्पाचे पाणी वितरिकांतून तलावात पोहोचत नाही. हा तलाव पावसाळ्यातही कोरडा राहतो. बावनथडी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग केला, तर या तलावात मुबलक पाणीसाठा बाराही महिने राहू शकतो. त्यामुळे बारा गावांना सिंचनाचा लाभ होऊ शकतो.
बाॅक्स
मंत्रालयात बैठक
स्थापत्य अभियंत्यांनी याबाबत प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. त्या अनुषंगाने मुंबई येथे मंत्रालयात गणेशपूर उपसा सिंचन प्रकल्पासंदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीत जलसंपदामंत्री, खासदार प्रफुल्ल पटेल, आ. राजू कारेमोरे, सिंचन प्रकल्पाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या प्रकल्पाला तात्काळ मंजुरी देण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती आहे.