धार्मिक संस्थांच्या पुढाकारातून ‘हरितक्रांती’चे पाऊल
By admin | Published: November 9, 2016 12:49 AM2016-11-09T00:49:34+5:302016-11-09T00:49:34+5:30
जलयुक्त शिवार योजना : शेतकऱ्यांना मिळाला योजनेतून दिलासा
युवराज गोमासे करडी (पालोरा)
शासनाच्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेत शासनाच्या निधी बरोबर शेगाव - शिर्डी व मुंबईच्या सिद्धीविनायक ट्रस्ट आदी धार्मिक संस्थांनी सुद्धा कोट्यवधींचा निधी दिला. या निधीतून मोठी कामे झालीत. मोहाडी तालुक्यातील सनफ्लॅग आयर्न अमड स्टील कंपनीच्या बहुमुल्य योगदानामुळे सिंचनाच्या सुविधा निर्माण होवून शेतकऱ्यांसाठी ‘हरितक्रांती’ निर्माण झाली आहे.
जलयुक्त शिवार योजनेत अन्य धार्मिक व सामाजिक संस्था व संघटनांनी सुद्धा निधी दिल्यास जलसंसाधनांची मोठी कामे होण्यास मदत होणार आहे. शासनाच्या निधी बरोबर शेगाव - शिर्डी व मुंबईच्या सिद्धीविनायक ट्रस्ट आदी धार्मिक संस्थांनी सुद्धा करोडोंचा निधी दिला. मोहाडी तालुक्यातील सनफ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनीच्या बहुमुल्य योगदानामुळे सिंचनांच्या सुविधा निर्माण होवून शेतकरी सुखावण्यास मोठी मदत मिळाली. अन्य धार्मिक व सामाजिक संस्था व संघटनांनी सुद्धा शासनाच्या या कार्यात मदत केल्यास जलसंसाधनांमुळे शेतकरी वर्गाला मदत मिळेल.
जलयुक्त शिवार योजनेमुळे बेभरवशाची शेती बऱ्याच प्रमाणात भरवशाची झाली. तलाव, नाल्यांचे खोलीकरणामुळे हजारो हेक्टर शेतीला सिंचनाची सोय मिळाली. उथळ व अतिक्रमणाने बेजार झालेल्या तलावांनी मोकळा श्वास घेतला. बांध बंधाऱ्याच्या दुरुस्तीमुळे व नवनिर्माणामुळे पाण्याचा साठा निर्माण झाला. कोरड्या मातीच्या भेगांना पाण्याचा ओलावा मिळाला. तलावांचे गेट, बुजलेले कालवे, तलावांच्या पाळींची दुरुस्ती झाली. यासाठी शासनाच्या निधीबरोबर शेगाव - शिर्डी व सिद्धीविनायक ट्रस्टनी सुद्धा कोट्यवधींचा निधी दिला.
त्यांच्या बहुमुल्य योगदानामुळे शेतकरी सुखावण्यास मोठी मदत मिळाली. मोहाडी तालुक्यातील सनफ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनीने पिंपळगाव येथे नाला खोलीकरणाचे काम स्वत:च्या निधीतून केले. यासाठी त्यांनी २.९७ लाखांचा निधी खर्ची घातला. करडी येथील तीन कि.मी. लांबीच्या नाला खोलीकरणासाठी २० लाखांचा निधी सिद्धी विनायक मंदिर ट्रस्टने दिला. यामुळे मोठा फायदा शेतीला व शेतकऱ्यांना झाला.
मोहाडी तालुक्यात पाटबंधारे विभाग, वनविभाग, कृषी विभाग, सामाजिक वनीकरण, पंचायत समिती आदी विभागामार्फत सन २०१४-१५-१६ या वर्षात जलयुक्त शिवार योजनेतून कोट्यवधी रूपयांचा निधी सिंचनाच्या शाश्वत सुविधा निर्माण करण्यासाठी खर्ची घातला गेला. जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून नाला खोलीकरण, नाल्यांवरील बांध - बंधाऱ्यांची दुरुस्ती, तलावांचे खोलीकरण, कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरुस्ती, नवीन बांध-बंधाऱ्यांची निर्मिती, कालव्याचे नुतनीकरण, तलावांच्या पाळींची दुरुस्ती आदी कामे केली गेली. याचा मोठा फायदा परिसरातील शेतीला भविष्यात होईल, शात शंका नाही. करडी परिसरात सन २०१६-१७ च्या खरीप हंगामात धानाच्या पेरणीसाठी अपुरा पाऊस पडला तेव्हा शेतकरीवर्गाने याच संसाधनातील पाण्याचा वापर करून परे जगविले. पाणी खेचून रोवणी आटोपली. निसर्गाच्या लहरीपणावर त्यामुळे काही प्रमाणात का होईना मात करता आली. मात्र ज्या शेतकरीवर्गाने या योजनेचा लाभ घेतला नाही, अशांच्या जमिनी पडीत राहिल्याचेही वास्तव स्थिती यावर्षी दिसून आली. त्यामुळे शासनासोबत खुद्द देवानेच शेतकऱ्यांसाठी ही योजना आणल्याची अनुभूती येत आहे.
मोहाडी तालुक्यात पिंपळगाव येथे सनफ्लॅग कंपनीच्या २.९७ लाखाच्या योगदानातून तसेच करडी येथे सिद्धी विनायक मंदिर ट्रस्ट मुंबईच्या फंडातून २० लाखाचे नाला खोलीकरणाचे काम झाले. अन्य संस्थांनी सुद्धा योगदान दिल्यास चांगला परिणाम दिसून येईल. शेतीला ही योजना वरदान ठरली असून यामुळे निसर्गाचे समतोल राखण्यास मदत होईल.
- किशोर पाथ्रीकर, तालुका कृषी अधिकारी, मोहाडी.
करडी परिसरात पाऊस कमी पडलेला असताना शेतकरी वर्गाने मोठ्या प्रमाणात नाल्यातील पाण्याचा उपसा करून पऱ्हे व रोवणी केली. आज त्या शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळाले आहे. नाल्यात अद्यापही पाणी असल्याने रब्बीतही पिके घेण्यास मदत होणार आहे.
- निमचंद्र चांदेवार, कृषी पर्यवेक्षक, करडी.