‘ग्रीनफ्रेंड्स’ने अनुभवले दोन खगोलीय घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:27 AM2021-04-29T04:27:14+5:302021-04-29T04:27:14+5:30

लाखनी : येथील ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबतर्फे निसर्ग अभ्यासासोबत अवकाशात घडणाऱ्या अनेक खगोलीय घटनांचे निरीक्षण व अभ्यास सातत्याने मागील १६ ...

Greenfriends experienced two astronomical events | ‘ग्रीनफ्रेंड्स’ने अनुभवले दोन खगोलीय घटना

‘ग्रीनफ्रेंड्स’ने अनुभवले दोन खगोलीय घटना

Next

लाखनी : येथील ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबतर्फे निसर्ग अभ्यासासोबत अवकाशात घडणाऱ्या अनेक खगोलीय घटनांचे निरीक्षण व अभ्यास सातत्याने मागील १६ वर्षांपासून केला जात आहे.

याच उपक्रमांतर्गत या आठवड्यात चंद्र उपग्रहाच्या दोन खगोलीय घटना रात्रीच्या चांदण्या आकाशात ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबच्या सदस्यांना अनुभवता आल्या. २७ एप्रिलला चैत्र पौर्णिमेला सुपर मूनचा अनुभव, तर २५ एप्रिलला मून रिंग अर्थात चंद्रखळे किंवा हॅलो ऑफ मूनचा विस्मयकारक अनुभव घेता आला. या दोन्हीही खगोलीय घटना अनुभवताना अ. भा. अंनिस तालुका शाखा लाखनी व जिल्हा शाखा भंडारा तसेच नेफडो जिल्हा शाखा भंडाराचे यावेळी प्रामुख्याने सहकार्य लाभले.

चैत्र पौर्णिमेच्या 'सुपर पिंक मून' बद्दल अधिक माहिती देताना खगोल अभ्यासक व ग्रीनफ्रेंड्सचे कार्यवाह प्रा. अशोक गायधने यांनी सांगितले की, पौर्णिमेला चंद्र साधारणपणे ३ लाख ८४ हजार किलोमीटर अंतरावर असतो; पण काल चैत्र पौर्णिमेला चंद्र अधिक जवळ म्हणजे ३ लाख ५७ हजार किलोमीटर अंतरावरून पृथ्वीच्या सभोवताली मार्गक्रमण करीत होता. त्यामुळे चांद्रबिंब १४ टक्के आकाराने मोठा व ३० टक्के अधिक तेजस्वी भासत होता. जेव्हा चंद्र पृथ्वीच्या जवळच्या कक्षेत असतो, त्याला 'सुपर मून' किंवा 'पेरिगी फुल मून' असे संबोधतात. यामुळेच यावर्षीच्या या पहिल्या मोठ्या चांद्रबिबाला 'सुपर मून' असे म्हटले गेले. त्याचप्रमाणे प्रत्येक पौर्णिमेला रंगानुसार वेगळे नाव देण्याची प्रथा सुरू झाल्याने या चैत्र पौर्णिमेला पिंक मून असे म्हणतात, म्हणजे एका अर्थाने 'सूपर पिंक मून' असे नामकरण या घटनेचे केले गेले, अशी माहिती त्यांनी पुरविली. यावेळी त्यांनी उपस्थित ग्रीनफ्रेंड्स, अंनिस व नेफडोच्या सदस्यांना या चांद्रबिबाचा १४ टक्के मोठा भाग दिसल्याने दुर्बीण व टेलिस्कोपमधून चांद्रबिंबावरील विविध विवरे व त्यांचे जुन्या खगोलशास्त्रज्ञांचे स्मृतिप्रीत्यर्थ दिलेली नावे जसे टायको, कोपर्निकस, अरिस्टार्चस, पोलोडीनिअस, गॅसेनडी, केप्लर, प्लेटो यांच्याबद्दल व त्यांच्या आकाराबद्दल माहिती दिली.

प्रत्यक्ष स्थान त्यांना टेलिस्कोप व दुर्बिणीद्वारा दाखविले. तसेच विवरकिरणे, काळी ज्वालामुखीपासून तयार झालेल्या सावलीसदृश जागेबद्दल माहिती देऊन त्याची विविध इंग्रजी नावे त्यांना प्रत्यक्ष निरीक्षणातून समजावून दिली. चंद्रावरील दहा प्रमुख भौगोलिक घटना कुठे आहेत तसेच त्यावरील डोंगररांगा, दऱ्या, त्यांचे आकार, उंची, खोली, त्यांची इंग्रजी नावे व त्यांचे स्थाननिश्चिती त्यांनी दुर्बिणीद्वारा व चार्टद्वारा समजावून देत अनेक खगोल विज्ञान घटनांची माहिती यावेळी दिली.

त्याचप्रमाणे दोन दिवसांपूर्वी चांद्रबिंबाभोवती जे गोल कड्याप्रमाणे 'मून रिंग' अर्थात 'चांद्रखळे' किंवा 'हॅलो ऑफ रिंग' तयार झाले होते, या विस्मयकारक खगोलीय घटनेचे दर्शन रात्रीच्या चांदण्या आकाशात ग्रीनफ्रेंड्स, अंनिस व नेफडोच्या सदस्यांना घडविले व त्यावर वैज्ञानिक माहिती देऊन गैरसमज, भीती, शकुन -अपशकुन तसेच अंधश्रद्धा दूर केल्या. याबद्दल अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, आकाशात २६ हजार फूट उंचीवर षट्कोनी बर्फाळ कण असले तर प्रकाशाच्या अपपरिवर्तनाने ते गोलाकार रिंगण चंद्राभोवती तयार होते. ही घटना विशेषकरून मार्च, एप्रिल, तसेच सप्टेंबर, ऑक्टोबरला अवकाशात जास्त बघायला मिळते. बर्फाळ देशात व भागात याचे प्रमाण जास्त असते. अशाच प्रकारची रिंग सूर्याभोवतीसुद्धा कधी कधी तयार होते, त्याला 'सोलर रिंग' अथवा 'सोलर रेनबो' वा 'हॅलो ऑफ सन' असे संबोधिले जाते, अशी माहिती त्यांनी दिली.

दोन्ही खगोलीय घटनेच्या निरीक्षण उपक्रमाला कोरोना आजारांचे सर्व संकेत, नियम व सुरक्षितता पाळून प्रा. अशोक गायधने, अथर्व गायधने, पूजा रोडे, अर्णव गायधने, योगिता रोडे, प्रा. अर्चना गायधने, अश्विन रोडे यांनी तसेच ग्रीनफ्रेंड्सचे पदाधिकारी अशोक वैद्य, दिनकर कालेजवार, पंकज भिवगडे, दिलीप भैसारे, योगेश वंजारी यांनी सहकार्य केले.

Web Title: Greenfriends experienced two astronomical events

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.