बसमधील ३९ प्रवाशांचे प्राण वाचविणाऱ्या चालकाचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 06:00 AM2020-03-06T06:00:00+5:302020-03-06T06:00:13+5:30
तुमसर येथून नागपूरकडे प्रवाशांना घेऊन जाणारी एसटी बस वरठी येथील रेल्वे ओव्हरब्रिजजवळील ४० फुट खोल खाईत उतरली. दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात हा अपघात घडला. बस थेट उतारावरुन खाईकडे निघाली असतांना चालकाने प्रसंगावधान राखत बस थांबविली. सर्व ३९ प्रवाशांचे प्राण वाचले. क्षणाचीही नजरचूक झाली असती तर अपघातात होणाऱ्या नुकसानीची कल्पनाही करवत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरठी : तब्बल चाळीस फुट खोल खाईत बस उतरुनही चालकाच्या प्रसंगावधानाने एकाही प्रवाशाला साधे खरचटले नाही. ३९ प्रवाशांसाठी देवदूत ठरलेला बस चालक संदेश वाहाने यांचा वरठीकरांनी पुढाकार घेवून सत्कार केला. या अपघाताची आणि चालकाच्या समयसुचकतेची दिवसभर वरठीतच नव्हे संपूर्ण जिल्ह्यात चर्चा होती.
तुमसर येथून नागपूरकडे प्रवाशांना घेऊन जाणारी एसटी बस वरठी येथील रेल्वे ओव्हरब्रिजजवळील ४० फुट खोल खाईत उतरली. दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात हा अपघात घडला. बस थेट उतारावरुन खाईकडे निघाली असतांना चालकाने प्रसंगावधान राखत बस थांबविली. सर्व ३९ प्रवाशांचे प्राण वाचले. क्षणाचीही नजरचूक झाली असती तर अपघातात होणाऱ्या नुकसानीची कल्पनाही करवत नाही. एसटी बसमधील प्रवाशांसाठी चालकच देवदूत ठरला. अशा या देवदूताचा सत्कार वरठीकरांनी करुन आपली कृतज्ञता व्यक्त केली. नागरिकांनी चालक संदेश वाहने आणि वाहक सोपान तुंबडे यांचा सत्कार केला. यावेळी वरठीचे माजी सरपंच संजय मिरासे, ग्राम पंचायत सदस्य अतुल भोवते, उद्योजक मानिक शहारे, माजी मुख्याध्यापक हरिभाऊ भाजीपाले, चेतक डोंगरे आदींसह गावकरी उपस्थित होते. या अपघातात गोंधळलेल्या चालकाला मदत करण्यासाठी वरठी ग्रामपंचायतीचे सदस्य अतुल भोवते धावुन आले. अतुल आणि संदेश हे बालपणीचे मित्र. संकटाच्या काळात तो दिवसभर संदेशसोबत धावपळ करताना दिसत होता.
चार तासांच्या प्रयत्नानंतर बस काढली बाहेर
चाळीस फुट खोल दरीत उतरलेली बस काढण्याचा मार्ग सापडत नव्हता. अपघाताने गोंधळलेल्या अवस्थेत असलेल्या चालकाने बस काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु बस चिखलात फसली. जेसीबी मशीनची गरज होती. याबाबत उद्योजक माणिक शहारे यांना माहिती मिळाली. मात्र त्यांचा चालक सुट्टीवर होता. परिस्थितीचे गांभीर्य घेत त्यांनी स्वत: जेसीबी चालवित आणला. बस बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु झाले. मात्र समोर मार्गच सापडत नव्हता. त्यावेळी चेतक डोंगरे यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या घराचे कुंपन तोडून मार्ग मोकळा करुन दिला. चार तासानंतर ही बस बाहेर आली. बस बाहेर आल्यानंतर जेसीबी मशीनचे भाडे व तुटलेल्या कुंपनाच्या नुकसान भरपाईची विचारणा चालकाने केली. त्यावेळी मानिक शहारे व चेतक डोंगरे यांनी मोबदला घेण्यास नकार देत प्रवाशांचे जीव वाचविल्याबद्दल पाठ थोपटली.
आमदार राजू कारेमोरेंकडून दखल
आमदार राजू कारेमोरे यांना या भीषण अपघाताची आणि त्यातून ३९ प्रवाशी बचावल्याची माहिती मिळाली. ते सध्या मुंबई अधिवेशनाच्या निमित्ताने आहे. त्यांनी तात्काळ चालकाला मदत करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या. चालक वाहने यांच्या कामगिरीचे कौतुक केले.