ग्रामस्थांच्या संतापामुळे पिंडकेपारचे तक्रारकर्ते नरमले
By admin | Published: January 18, 2017 12:26 AM2017-01-18T00:26:54+5:302017-01-18T00:26:54+5:30
पिंडकेपार जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्रावण हजारे यांना येथेच कायम ठेवण्यात यावे, ...
प्रकरण संपुष्टात : मुख्याध्यापकांच्या बाजूने ग्रामस्थ राहिले ठाम
भंडारा : पिंडकेपार जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्रावण हजारे यांना येथेच कायम ठेवण्यात यावे, या मागणीसाठी संपूर्ण गाव एकत्रित आल्यानंतर त्यांचा विरोध करणाऱ्यांनीही आम्ही तक्रार केली नव्हती, असे सांगू लागले. ग्रामस्थांचा संताप पाहून तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांची चांगलीच भंबेरी उडाली होती.
पिंडकेपार जिल्हा परिषद शाळेत श्रावण हजारे हे मुख्याध्यापक आहेत. ते पिंडकेपार येथे रूजू झाल्यानंतर शाळेसह शिक्षणात सुधारणा केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. हजारे यांच्यामुळे बाहेरगावी जाणारे विद्यार्थी आता गावातच शिक्षण घेत आहेत. असे असताना ज्यांची मुले या शाळेत नाहीत, अशांनी त्यांना हटविण्याची मागणी केली होती. या प्रकारामुळे हजारे यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहात पिंडकेपार येथील ग्रामस्थांनी आंदोलनाचा ईशारा दिला होता. त्यानंतर ग्रामस्थ शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देणार होते. तत्पूर्वीच सोमवारला गटशिक्षणाधिकारी श्यामकर्ण तिडके व विस्तार अधिकारी राठोड यांच्या उपस्थितीत पिंडकेपार जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सभा बोलाविण्यात आली. या सभेत सर्व ग्रामस्थांनी मुख्याध्यापक श्रावण हजारे हे याच शाळेत असावे अशी मागणी केली. त्यानंतर तक्रारकर्त्यांनी आम्ही तक्रार केली नव्हती अशी सावरासावर केली. त्यानंतर तणाव निवळला. (जिल्हा प्रतिनिधी)