खेळाच्या मैदानासाठी घर केले भुईसपाट
By admin | Published: April 5, 2017 12:16 AM2017-04-05T00:16:46+5:302017-04-05T00:16:46+5:30
नोकरी व शिक्षणानिमित्त बाहेरगावी राहात असलेल्या व्यक्तीचे घर एका खासगी प्राथमिक शाळेच्या संचालकांनी भुईसपाट केले.
सालेबर्डी येथील प्रकार : पोलिसांकडे तक्रार
भंडारा : नोकरी व शिक्षणानिमित्त बाहेरगावी राहात असलेल्या व्यक्तीचे घर एका खासगी प्राथमिक शाळेच्या संचालकांनी भुईसपाट केले. हा संतापजनक प्रकार भंडारा तालुक्यातील सालेबर्डी येथे घडला आहे. या प्रकरणी घरमालकाने जवाहरनगर पोलिसांकडे तक्रार नोंदविली आहे.
सालेबर्डी हे गाव गोसेखुर्द पुनर्वसनात गेले आहे. या घरांचे संपादन जरी झाले असले तरी या ग्रामस्थांना प्रशासनाने अन्य कुठेही घर किंवा प्लाटसाठी जागा दिलेली नसल्याने ग्रामस्थ सालेबर्डी येथेच वास्तव्य करीत आहेत. गावातीलच अनिल नारनवरे व त्यांची वहिणी गीता राजकुमार नारनवरे यांच्या हक्काचे सालेबर्डीत विटामातीचे घर आहे. या घराला प्रणाद प्राथमिक शाळेच्या संचालकांनी जमीनदोस्त केले आहे.
मागील काही वर्षापासून गीता नारनवरे या नागपुरला तर अनिल नारनवरे हे नोकरीनिमित्त लाखांदूरला राहत आहेत. त्यामुळे सालेबर्डी येथे त्यांचे या घरी कुणीही राहत नाही. मात्र या घराची कर आकारणी ग्रामपंचायतला नेहमी देण्यात येते. यांच्या घरालगतच प्रणाद प्राथमिक शाळा सुरु करण्यात आली असून या शाळेच्या संचालकांनी शाळेच्या विद्यार्थ्यांना खेळाचे मैदान नसल्याने या रिकाम्या घराला जमीनदोस्त करून तिथे खेळाचे मैदान तयार करण्याचे षडयंत्र रचले.
याबाबत त्यांनी गोसीखुर्द पुनर्वसन विभागाच्या आंबाडी येथील कार्यकारी अभियंत्यांकडून सदर ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी खेळाचे मैदान देण्यात यावे अशी मागणी केली. त्यानुसार कार्यकारी अभियंत्यांनी कुठलेही कागदपत्र किंवा मोका पंचनामा न करता खेळाचे मैदानासाठी ती जागा वापरण्याची परवानगी दिली. यामुळे सदर शाळेच्या संचालकांनी विटामातीचे घर घरमालकाची परवानगी न घेता परस्पर जमीनदोस्त केली. या प्रकरणी ममता अनिल नारनवरे यांनी प्रभूदास गजभिये व अवंतिका कांबळे यांच्याविरुद्ध जवाहरनगर पोलिसात तक्रार दाखल केली. त्या तक्रारीत त्यांच्या वहीवाटीचे विटामातीचे घर पाडल्याने सुमारे तीन लाखांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस प्रशासन व गोसेखुर्द प्रशासन काय भूमिका घेते याकडे आता ग्रामस्थांच्या नजरा लागल्या आहेत. (शहर प्रतिनिधी)