पाण्यासाठी मुख्यधिकाऱ्यांना घेराव
By admin | Published: May 8, 2016 12:36 AM2016-05-08T00:36:51+5:302016-05-08T00:36:51+5:30
पालिका प्रशासनाकडून शहरातील नळजोडणी धारकांना पिण्याचे पाणी पुरवठा करण्यात येते.
आश्वासनानंतर घेराव मागे : विदर्भ राज्य आंदोलन समितीचे आंदोलन
भंडारा : पालिका प्रशासनाकडून शहरातील नळजोडणी धारकांना पिण्याचे पाणी पुरवठा करण्यात येते. मात्र वैनगंगेचे पात्र ईकोर्निया व रासायनिक द्रव्यामुळे दूषित झाले आहे. हे पाणी पिण्यास सोडण्यात येत आहे. यामुळे संतप्त विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने पालिकेचे मुख्यधिकारी रविंद्र देवतळे यांना आज घेराव घालण्यात आला.
दूषित पाणी पिल्याने शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत पालिका व जिल्हा प्रशासनाला अनेकदा निवेदन देवूनही या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे आज शनिवारला विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पदाधिकारी माजी आमदार आनंदराव वंजारी, माजी आमदार मधुकर कुकडे, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हाध्यक्ष अॅड. पद्माकर टेंभुर्णीकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी देवतळे यांना घेराव घालण्यात आला. यावेळी वंजारी यांनी नागरिकांच्या पिण्याच्या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधले व नदीपात्रात पसरलेली ईकॉर्निया नष्ट करण्याची मागणी केली. चर्चेदरम्यान मधुकर कुकडे यांनी वैनगंगा नदी ही गोसीखुर्द धरण बनण्यापुर्वी स्वच्छ होते. नदीचे पाणी पिण्यायुक्त होते आता नदी दूषित झाल्याने पिण्याचे आरोग्य बिघडत आहे.
यावेळी झालेल्या चर्चेत मुख्याधिकारी देवतळे यांनी शिष्टमंडळाला पिण्याचे पाणी जलसंपदा विभागाकडून विकत घेत असल्याचे सांगितले. त्यामुळे स्वच्छ पाणी पुरवठ्याचे काम जलसंपदा विभागाचे असल्याचे त्यांनी सांगितले. पिण्याचे पाणी स्वच्छ करण्याच्या आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे आश्वासन मुख्याधिकारी देवतळे यांनी यावेळी दिले. यावेळी तुषार हट्टेवार, अर्जुन सुर्यवंशी, केशव हूड, दामोधर क्षीरसागर, योगेश्वरी कोचे, लोकेश गोन्नाडे, भारत चौधरी, देविदास गभने, जाधवराव साठवणे, गोविंदराव चरडे आदी उपस्थित होते.
(शहर प्रतिनिधी)