धान उत्पादक शेतकºयांना एसआरटी पद्धत ठरणार वरदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 11:45 PM2017-11-04T23:45:32+5:302017-11-04T23:45:51+5:30
धान उत्पादक जिल्हा अशी ओळख असलेल्या भंडारा, गोंदिया जिल्ह्यात दरवर्षी तीन लाख हेक्टर शेतजमिनीत धान पिकांची पारंपारिक पद्धतीने लागवड केली जाते.
मोहन भोयर।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : धान उत्पादक जिल्हा अशी ओळख असलेल्या भंडारा, गोंदिया जिल्ह्यात दरवर्षी तीन लाख हेक्टर शेतजमिनीत धान पिकांची पारंपारिक पद्धतीने लागवड केली जाते. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात पीक लागवडीत सुधारणा होत असल्याचे चित्र यावर्षी दोन्ही जिल्ह्यात दिसत आहे. एसआरटी सगुणा राईस तंत्र पद्धत शेतकºयांकरिता वरदान ठरली आहे.
तीन प्रकारे धानाची लागवड भात पट्ट्यात करण्यात येते, यात श्री पद्धत, पारंपारिक पद्धत व एसआरटी पद्धतीचा त्यात समावेश आहे. वारंवार नांगरणीने जमिनीची पोत खराब होते. जमिनीची धूप थांबवून नैसर्गीक गांढूळ निर्मितीला चालना देऊन जमिनीचा सेंद्रीय कर्ब वाढवून उत्पादन वाढ करणारी पीक रचना म्हणजे एसआरटी पद्धत होय. या पद्धतीचा प्रचार १९९० च्या दशकांत रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील नेरळ मधील सगुना बागेत झाला. कृषिभूषण चंद्रशेखर भडसावळे यांनी या पद्धतीचा प्रचार करायला सुरूवात केली.
पावसाळ्याच्या सुरूवातीला मे किंवा जून महिन्यात शेतातील जमिनीचे सपाटीकरण करून त्यावर उभी, आडवी नांगरणी करून त्यावर रोटावेटर चालवून मातीचे बारीक ढीग करून घ्यावे. नंतर १३६ सेमी म्हणजे साडे चार फूट बाय १०० सेंटीमीटर अंतर माथा असलेले गादी वाफे तयार करावे. त्यानंतर एसआरटीच्या सायाने वाफ्यावर मोठे छिद्र पाडून त्यात एका छिद्रात तीन ते चार दाणे धानाचे, चिमुटभर सेंद्रीय खत टाकून माती काढून छिद्र बुजवून द्यावी यामुळे पहिला पाऊस कधी पडेल याची चिंता शेतकºयाला भेडसवणार नाही. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या बियाणांना अंकुर येऊन लोंबे फुटतात. गादी वाफ्यामुळे भात पिकांच्या रोपांच्या मुळाशी प्राणवायूचे प्रमाण तसेच पूरेशा ओलावा राहतो.
यामुळे रोग कमी व धान पिकांची लागवड वाढेल व अवकाळी पावसाचा फटका देखील बसणार नाही. दोन वर्षापासून पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात या पद्धतीचा प्रचार कृषिभूषण चंद्रशेखर भडसावळे यांनी केला. जून २०१६ मध्ये एसआरटी पद्धतीने लागवड केलेल्या धान पिकांना अवकाळी पावसात देखील धान पिक डौलाने उभे होते. पारंपारिक पिकांच्या तुलनेत एसआरटी पद्धत जास्त उत्पादन देत आहे.
धानपिक निघाल्यानंतर कडधान्य व भाजीपाला लागवड करण्याचा सल्ला कृषिभूषण भडसावळे यांनी दिला. कीड लागू नये म्हणून शेतावर प्रकाश सापळा बसविण्यात आला आहे. या पाण्यात हे कीटक पडत असून योग्य फवारणी करून त्याचा फायदा धान उत्पादक शेतकºयांना होतो. पूर्व विदर्भातील ८० हजार हेक्टर शेतजमिनीवर एसआरटी पद्धतीने धानाची लागवड करण्यात आली आहे.
भंडारा तालुक्यात सुरेंद्र मदनकर यांच्या शेतात एसआरटी पद्धतीने धानाची लागवड करण्यात आली असून त्याचा लाभ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या त्यांच्या शेतावर जिल्ह्यातील शेतकरी भेटी देत आहेत.