लाखनी तालुक्यातील वाढत्या रुग्णसंख्येने आरोग्य यंत्रणा हतबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:35 AM2021-04-21T04:35:23+5:302021-04-21T04:35:23+5:30
लाखनी व परिसरात कोरोनाचा कहर सुरू आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यात आता ग्रामीण भागातील रुग्णांचा आकडा ...
लाखनी व परिसरात कोरोनाचा कहर सुरू आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यात आता ग्रामीण भागातील रुग्णांचा आकडा धडकी भरवणारा आहे. दररोज लाखनी परिसरातील रुग्णसंख्या शंभराहून अधिक वाढत आहे. त्यामुळे आता लाखनी परिसराच्या ठिकाणी कोविड सेंटर सुरू केले पाहिजे, अशी मागणी जोर धरत आहे. रुग्णसंख्या कमी होण्याचे नाव घेत नसल्याने उपचारासाठी भंडारा गाठावे लागते. पालांदूरसारख्या मोठ्या गावातही कोविड सेंटर सुरू करावे, अशी मागणी होऊ लागली आहे.
तालुक्यातील किन्ही, गडेगाव, मेंढा, पोहरा, सालेभाटा, मासलमेटा, बोरगाव, आलेसूर, राजेगाव, पिंपळगाव , चीचटोला, रेंगेपार कोहळी, सिपेवाडा, गराडा, खराशी, जेवनाळा, मऱ्हेगाव, वाकल, निमगाव, खुनारी, लोहारा, पाथरी, कवलेवाडा, मेंगापूर यासह तालुक्यातील अनेक गावांत कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची दमछाक होत आहे. त्यात लसीकरण मोहीम आणि कोरोना चाचणी एकाच वेळी करण्याची वेळ आरोग्य यंत्रणेवर आली आहे. त्यात रुग्णवाढ दिवसेंदिवस सुरू आहे.
ग्रामीण भागातून रोजगारासाठी शहराकडे येणार्यांचा जास्त ओढा आहे. या लोकांकडून कोरोनाचा गावांकडे प्रसार झाला आहे. खासगी दवाखान्यात सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण तपासणीसाठी भरमसाट येत असून, कधी नव्हे ते रुग्णांच्या गर्दीचा उच्चांक तालुक्यातील गावात पाहायला मिळत आहे.
उपचारासाठी ठरते अडसर
गेल्या काही दिवसांत कोरोनामुळे मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना कोरोनाची बाधा झाल्याचे लवकर निष्पन्न होत नाही. त्यांची ऑक्सिजन लेव्हल नीचांकी झाल्यानंतर बाहेर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यामुळे उपचार करण्यात अनेक अडचणी येतात असे समोर आले आहे.
बॉक्स
घरोघरी तपासणी होणे आवश्यक
माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियान अंतर्गत आरोग्य यंत्रणेमार्फत गावागावांतील घराघरांत जाऊन नागरिकांची तपासणी केली होती, तशी तपासणी होणे आवश्यक आहे.
भीतीमुळे रुग्ण घरातच
बॉक्स
सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी अशा प्रकारची लक्षणे आढळल्यानंतर ग्रामीण भागातील नागरिक एखाद्या डॉक्टरकडे जाऊन जुजबी औषध घेतात. कोरोना चाचणी लवकर करीत नाही. त्यामुळे कुटुंब आणि शेजारीही कोरोनाने बाधित होतात. चाचणी केल्यानंतर कोविड सेंटरमध्ये जावे लागते. त्यात मोठा खर्च होईल, याची भीती अनेकांच्या मनात असते.