हमीभाव धान विक्री नोंदणी अडचणीत; ॲप काम करेना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 11:30 AM2024-11-14T11:30:16+5:302024-11-14T11:31:11+5:30

केंद्रांवर शेतकरी ताटकळत : नोंदणीसाठी मुदत वाढविण्याची अपेक्षा

Guaranteed paddy sale registration in trouble; App not working | हमीभाव धान विक्री नोंदणी अडचणीत; ॲप काम करेना

Guaranteed paddy sale registration in trouble; App not working

लोकमत न्यूज नेटवर्क 
भंडारा :
यंदा विधानसभा निवडणुकांमुळे शासनाने हमीभाव धान नोंदणी, उचल व भरडाईची मंजुरी एकाचवेळी दिली. यंदा जिल्ह्यात हमीभाव धान खरेदी केंद्रावर धान विक्री नोंदणीला नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरुवात झाली आहे. परंतु, नोंदणीचे ॲप काम करीत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. परिणामी, शेतकऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. धान विक्री नोंदणीची अंतिम मुदत १५ नोव्हेंबर असल्याने या मुदतीत वाढ करण्याची अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.


जिल्ह्यात अनेक हमीभाव केंद्रांवर नोंदणीचे ॲप काम करीत नसल्याने शेतकऱ्यांना शेती कामे सोडून नोंदणीसाठी ताटकळत उभे राहावे लागत आहे. सध्या धान कापणी व मळणीची कामे जोमात आहेत. असे असताना हमीभाव केंद्रांवर धानाची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीची प्रक्रिया ऑनलाइन आहे. यासाठी स्वतंत्र ॲप तयार करण्यात आले आहे. यावर्षी ॲपमध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत. केंद्र चालकांना बरीच माहिती व कागदपत्रे अपलोड करावी लागत आहेत. यासाठी शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर उपस्थित राहावे लागत आहे. 


नोंदणीसाठी लागतात सरासरी २० मिनिटे 
धान विक्री नोंदणीचे ॲप काम करीत नसल्याने नोंदणी प्रक्रियेला बराच वेळ लागत आहे. एका शेतकऱ्याच्या नोंदणीसाठी सरासरी २० मिनिटांपेक्षा अधिक कालावधी लागत आहे. दिवसभरात जास्तीत ३० ते ४० शेतकऱ्यांचीच नोंदणी होत आहे. मात्र, केंद्रावर दरदिवशी शेकडो शेतकरी दाखल होते आहेत. गर्दी टाळण्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज स्वीकारल्यानंतर टोकन क्रमांक दिला जात आहे.


शासनाच्या लाभासाठी नोंदणी गरजेची 
शेतकऱ्यांचा होणारा त्रास वाचविण्यासाठी नोंदणी केंद्र चालकांकडून टोकन देत दोन ते चार दिवसांनंतर केंद्रावर नोंदणीसाठी येण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तीन ते चार चकरा माराव्या लागतात. शेतकऱ्यांना शासनाच्या अनुदानाचा अथवा बोनसचा लाभ मिळण्यासाठी नोंदणी आवश्यक असते.


गतवर्षीही मिळाली होती मुदतवाढ 
यंदा हमीभाव धान विक्री नोंदणीसाठी अंतिम दि. १५ नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यामुळे मुदतीत नोंदणीसाठी शेतकरी गर्दी करत आहेत. मात्र, जोपर्यंत दिलेले उद्दिष्ट पूर्ण होत नाही, तोपर्यंत मुदतवाढ दिली जाणार आहे. गतवर्षीही फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ मिळाली होती.


व्यापाऱ्यांकडून होतेय शेतकऱ्यांची लूट
धान विक्रीसाठी नोंदणीची प्रक्रिया आटोपल्यानंतर धान खरेदीला प्रारंभ होणार आहे. परंतु, पैशाची गरज भागविण्यासाठी शेतकरी व्यापाऱ्यांच्या चक्रव्यूहात फसताना दिसत आहेत. व्यापाऱ्यांकडून कमी दरात धानाची खरेदी केली जात आहे. व्यापाऱ्यांचे दलाल सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. 


"जिल्ह्यात धान विक्रीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. परंतु, अनेक केंद्रांवरील ॲप काम करीत नाही. त्यामुळे प्रक्रियेला विलंब लागत आहे. यावर उपाय म्हणून शासनाने नोंदणीची मुदत वाढविणे गरजेचे आहे."
- आकाश गायधने, शेतकरी, मोहाडी

Web Title: Guaranteed paddy sale registration in trouble; App not working

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.