नेरला उपसा सिंचन योजनेची पालकमंत्र्यांनी केली पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 12:28 AM2019-07-24T00:28:16+5:302019-07-24T00:28:54+5:30
गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पांतर्गत नेरला उपसा सिंचन योजनेला आज पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी भेट देवून पाहणी केली. नेरला उपसा सिंचन योजनेचे पंपगृह ,वैनगंगा नदीच्या डाव्या तिरावर नेरला गावाजवळ बांधण्यात आले आहे. पंपगृहामध्ये प्रत्येकी १०१५ अश्वशक्तीचे १२ व्हर्टीकल टरबाईन पंप बसविण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पांतर्गत नेरला उपसा सिंचन योजनेला आज पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी भेट देवून पाहणी केली. नेरला उपसा सिंचन योजनेचे पंपगृह ,वैनगंगा नदीच्या डाव्या तिरावर नेरला गावाजवळ बांधण्यात आले आहे. पंपगृहामध्ये प्रत्येकी १०१५ अश्वशक्तीचे १२ व्हर्टीकल टरबाईन पंप बसविण्यात आले आहे. या योजनेला पालकमंत्र्यांनी भेट देवून पाहणी केली. नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
अधीक्षक अभियंता जगत टाले, कार्यकारी अभियंता पृथ्वीराज फाळके, सहाय्यक अभियंता अमोल वैद्य, उपविभागीय अभियंता अजय वैद्य, अजय कावळे व विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. उर्ध्व नलिकेच्या चार रांगा २५०० मि.मी. व्यासाच्या १६ मि.मी जाडीच्या ०.६९० कि.मी. लांबीच्या आहेत. याद्वारे ३७ घ.मी./से.चा. विसर्ग वितरण कुंडात सोडण्याचे प्रस्तावित आहे. या योजनेद्वारे भंडारा जिल्हयाच्या चार तालुक्यातील ११६ गावातील २१ हजार ७२७ हेक्टर लाभ क्षेत्राच्या माध्यमातून २८,६८० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. त्याकरीता एकूण पाणी वापर १४३.७७ दलघमी इतका आहे, अशी माहिती योजनेचे अभियंता अमोल वैद्य यांनी दिली.
नेरला उपसा सिंचन योजनेमध्ये शेत व घर गेलेल्या नागरिकांनी पुर्नवसनाच्या मागणीसाठी आज पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांची भेट घेतली व आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. यावर बोलतांना पालकमंत्री म्हणाले की, पुर्नवसनाचे प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच जिल्हाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात येणार आहे. पुर्नवसन गावात विविध सुविधा मिळण्यासाठी नागरिकांनी पालकमंत्र्यांना विनंती केली. याबाबत संबंधित विभागाला तातडिने सुविधा पुरविण्यासाठी निर्देश देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. घराच्या मोबदला मिळणेबाबत ही यावेळी निवेदन सादर करण्यात आले. हा प्रश्न बैठकीत निकाली काढू असे त्यांनी सांगितले. यावेळी नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.