पालकमंत्री-खासदार ‘राजीनामा’ने जिल्हा पोरका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 01:18 AM2017-12-14T01:18:02+5:302017-12-14T01:19:04+5:30
राज्याचे आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.दीपक सावंत हे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सहपालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर जून महिन्यात पालकमंत्रिपदाचा राजीनामा दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राज्याचे आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.दीपक सावंत हे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सहपालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर जून महिन्यात पालकमंत्रिपदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून ते स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम असो किंवा जिल्हा नियोजन समितीची बैठक असो, ते भंडारा जिल्ह्यात आले नाही. पालकमंत्री हे जिल्हा नियोजन समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. पालकमंत्री या बैठकीला येत नसल्यामुळे त्यांच्या स्वाक्षरीशिवाय अनेक विभागाच्या फाईल्स ‘जैसे थे’ आहेत. असे असतानाच पाच दिवसांपूर्वी नाना पटोले यांनी खासदारपदाचा राजीनामा दिला. ग्रामीण विकासाच्या विविध विषयांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या दिशा समितीचे खासदार हे पदसिद्ध अध्यक्ष असतात. त्यांच्या स्वाक्षरीशिवाय फाईल्सना मंजुरी मिळत नसल्यामुळे त्याचा जिल्ह्यातील विकासकामांवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यासर्व विषयांचा जिल्ह्यातील विकास कामे करताना कोणत्या अडचणी येऊ शकतात, या विषयावर काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना व मनसे पदाधिकाऱ्यांना बोलाविण्यात आले. ‘लोकमत’ व्यासपीठावर बुधवारला जिल्हा कार्यालयात आयोजित चर्चेत भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश बांते, राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार मधुकर कुकडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय शहारे, काँग्रेसचे जिल्हा महासचिव अॅड.शशिर वंजारी, शिवसेनेचे शहरप्रमुख सुर्यकांत ईलमे यांनी सहभाग घेऊन स्वपक्षाची जोरकस भूमिका मांडली.
पालकमंत्री व खासदारांच्या पदाच्या राजीनाम्यामुळे जिल्ह्याच्या विकासावर परिणाम होणार का? यावर मधुकर कुकडे म्हणाले, एका घरात दोन बायका असल्या तर त्यांचे कधी पटत नाही, त्यामुळे त्याचा विकासावर विपरित परिणाम होतो. नेमकी तशी अवस्था आजघडीला भंडारा जिल्ह्याची झाली आहे. पालकमंत्री नेमण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे. त्यामुळे एकाला पालकमंत्रिपद देऊन जिल्ह्याच्या विकासासाठी हा विषय मार्गी लावण्याची गरज आहे. नाना पटोले यांच्या राजीनाम्याचे समर्थन करीत नसल्याचे सांगून कुकडे म्हणाले, लोकशाहीत जनतेचे प्रश्न सभागृहाच्या माध्यमातून सोडविले पाहिजे, असे सांगितले.
राज्यात सर्वत्र तूर दाळ खरेदी केंद्र सुरू झालेले असताना भंडाºयात या केंद्रांना परवानगी नव्हती. त्यावेळी याबाबत तेव्हाचे जिल्हाधिकाºयांना विचारले असता त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींनी हा मुद्दा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपस्थित केला नव्हता, असे सांगून अशा विषयासह जिल्ह्यातील विविध प्रश्न रखडल्याचा आरोप कुकडे यांनी केला.
जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे आरोग्यमंत्री असतानाही भंडाऱ्यात स्वतंत्र महिला रूग्णालय झाले नाही, याविषयावर शिवसेनेचे सुर्यकांत ईलमे म्हणाले, नागपूरसारख्या मोठ्या जिल्ह्यात १३ आमदार असतानाही भाजपने सहपालकमंत्रीपद कुणालाही दिले नाही. केवळ तीन आमदारांचा जिल्हा असलेल्या भंडारा जिल्ह्यात सहपालकमंत्री देऊन शिवसेनेला दाबण्याचा वारंवार प्रयत्न होत आहे. अशा पालकमंत्री काम कसे करणार? असा प्रतिप्रश्न केला. त्यावर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश बांते म्हणाले, पालकमंत्री झाल्यानंतर डॉ.सावंत हे जिल्ह्यात कितीवेळा आले. केवळ ध्वजारोहणासाठी येत असल्यामुळे त्यांचा अधिकाºयांवर वचक नव्हता, जिल्ह्यातील विकासाची कामे वेगाने व्हावीत, यासाठी भाजप आमदारांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. त्यामुळे सहपालकमंत्री नेमण्यात आले, त्यात गैर काय? असे बांते म्हणाले.
काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसे हे विरोधी पक्षात असताना जिल्ह्यातील विकास कामांसाठी विरोधी पक्षाची भूमिका बजावताना दिसले नाही या विषयावर काँग्रेसचे शशीर वंजारी व मनसेचे विजय शहारे म्हणाले, आम्ही कर्जमाफीपासून महिला रूग्णालय व्हावे, यासाठी वारंवार आंदोलने केली असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील शेतकºयांना अद्याप कर्जमाफीचा अद्याप लाभ मिळालेला नाही. त्यामुळे कर्जमाफी ही केवळ घोषणाच ठरल्याचा आरोप केला. काँग्रेसच्या कार्यकाळात गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात निधी मिळाला होता. आता हा प्रकल्प होणार की नाही? याबाबत शंका असल्याचा आरोप केला.
या विषयावर रंगले चर्चासत्र
पालकमंत्री व खासदारांनी दिलेला पदाचा राजीनामा, स्वतंत्र महिला व बाल रूग्णालय, जिल्ह्याचा विकास, शेतकºयांची कर्जमाफी, वैनगंगा नदीचे प्रदूषित पाणी, आरोग्य सुविधा या विषयांवर चर्चा रंगली. यावेळी आरोप-प्रत्यारोगाच्या फैरीही रंगल्या असल्या तरी प्रत्येकांनी आपआपल्या पक्षाची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.
भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीत नागपूरच्या नदीच्या दूषित पाण्याचा प्रवाह येत आहे. त्यामुळे या पाण्याचा भंडारा जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे निवेदन आपण जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांना दिले होते. हा प्रकार आपल्याकडूनच मांडण्यात आला असला तरी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी मला अवगत केले नसल्याचे माजी आमदार मधुकर कुकडे यांनी यावेळी सांगितले.