गुलाल उधळणीला निकालाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:30 AM2021-01-17T04:30:38+5:302021-01-17T04:30:38+5:30
मोहाडी तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या आहेत. कालपासून कोण येणार, कोण पडणार याची चर्चा रंगत आहे. उमेदवार ...
मोहाडी तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या आहेत. कालपासून कोण येणार, कोण पडणार याची चर्चा रंगत आहे. उमेदवार आपली जिंकण्याची गणिते मांडत आहेत. काही तर अमक्या - तमक्याची पार्टी निवडून येईल याची पैज लावत आहेत. मोहाडी तालुक्यात मतदानाची टक्केवारी विक्रमी झाली आहे. त्यामुळे लढती अटीतटीच्या होतील असा कयास लावला जात आहे. मतदारांनी आपला मत टाकले. आता केवळ चर्चा करून मतदार सरपंच कोण होईल, याचा होईल याचा अंदाज बांधत आहेत. निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी ओल्या पार्ट्या बंद झाल्या आहेत. आता निवडणूक झालेल्या गावात कोणत्या समर्थित पक्षाचे बहुमत येते, याकडे राजकीय पक्षांच्या नेत्यांचे लक्ष लागून आहे. सगळेच सोमवारच्या दहा वाजताच्या ठोक्याची वाट पाहत. पॅनल लढविणारे नेते व त्यांचे गावातील कार्यकर्ते गुलाल उधळणीच्या वेळेची प्रतीक्षा करीत आहेत.
सोमवारी तहसील कार्यालयात सकाळी दहा वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. एकूण सहा टेबलांवर नऊ फेऱ्या होणार आहेत. एका फेरीत दोन ग्रामपंचायतींचे निकाल हाती येणार आहेत. पहिल्या फेरीत पिंपळगाव/का, कान्हगाव /सी, दुसऱ्या फेरीत मांडेसर, रामपूर, पिंपळगाव झं, तिसऱ्या फेरीत पारडी, दहेगाव, चौथ्या फेरीत पाचगाव, पाहुणी, पाचव्या फेरीत रोहा, भिकारखेडा, सहाव्या फेरीत सालई खुर्द, ताडगाव सिहरी, सातव्या फेरीत देव्हाडा बुज, नरसिंहटोला, पांजरा बोरी, आठव्या फेरीत जांभोरा, किसनपूर, खडकी व नवव्या फेरीत खडकी, केसलवाडा या ग्रामपंचायतींचा निकाल लागणार आहे.