तासिका तत्त्वावरील गुरुजी शेतमजुरीवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:43 AM2021-09-09T04:43:23+5:302021-09-09T04:43:23+5:30
दीड दशकांपासूनचा प्रश्न : जिल्ह्यात शंभरापेक्षा अधिक शिक्षकांची पदे रिक्त इंद्रपाल कटकवार भंडारा : एम.फील., नेट, सेट, एम. एड्. ...
दीड दशकांपासूनचा प्रश्न : जिल्ह्यात शंभरापेक्षा अधिक शिक्षकांची पदे रिक्त
इंद्रपाल कटकवार
भंडारा : एम.फील., नेट, सेट, एम. एड्. उत्तीर्ण होऊन प्राध्यापक झाल्यानंतरही अनेक प्राध्यापकांना अद्यापही पूर्णवेळ नियुक्तीचे आदेश न मिळाल्याने त्यांना तासिका तत्त्वावरच मागील दीड दशकांपासून प्रति तासिका ५४ व ७२ रुपयांप्रमाणे काम करावे लागत आहे. त्यातही आठवड्यातून केवळ ६ ते ८ तासिका मिळत आहे. काही शिक्षकांना काम न मिळाल्याने चक्क शेतमजुरीच्या कामावर जावे लागत आहे.
शासनाने तासिका तत्त्वावरील शिक्षक व प्राध्यापकांना केवळ तीन महिन्यांच्या नियुक्तीचे आदेश देऊन बोळवण केली. त्यामुळे उर्वरित ९ महिने कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना मोलमजुरी करून वेळ मारून न्यावी लागत आहे. काही तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांनी चहाटपरी टाकली तर काही रोजगारहमीच्या कामावर जात आहेत तर काहीजण शेतमजुरी करत आहेत. मात्र, शासनाने अद्यापही तासिका तत्त्वांवरील शिक्षक व प्राध्यापकांची दखल घेतली नाही.
कोट
मी अकरा वर्षांपूर्वी एमएससी बी.एड्. परीक्षा उत्तीर्ण केली. शिक्षकांची पदभरतीची मी प्रतीक्षा करत आहे. त्यामुळे तासिका तत्त्वावर काम करावे लागत आहे. त्यातही नियमितता नसल्याने विविध आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शासन केवळ आश्वासनावर वेळ मारून नेत आहे. ‘टू बी ऑर नॉट टू बी’ असा प्रश्न निर्माण झाला आहे.
- श्रीकांत खंडाईत, तासिका तत्त्वावरील शिक्षक.
शासनाने मागील आठ-दहा वर्षांपासून तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांची एकप्रकारे थट्टाच चालविली आहे. यंदा तर केवळ तीन महिन्यांच्या नियुक्तीचे आदेश देऊन आमच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा, असा प्रश्न आहे.
- उमेंद्र तरोणे, तासिका तत्त्वावरील प्राध्यापक
शासनाने मागील पंधरा ते सतरा वर्षांपासून शिक्षकांची रिक्त पदे भरली नाहीत. त्यामुळे काहींना तासिका तत्त्वावर खासगी महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाची मर्जी सांभाळत काम करावे लागत आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष दिल्यास समस्या तत्काळ सुटू शकते.
-चक्रधर राऊत, तासिका तत्त्वावरील
शिक्षक
दीड दशकभरापासून लटकला प्रश्न
शासनाने २०१२ पासून प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्यासाठी कुठलीच प्रक्रिया केली नाही. त्यामुळे रिक्त पदांचा आकडा ३५ हजारांवर पोहोचला आहे. दोन महिन्यांपूर्वी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी १५ दिवसांत प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापही त्या आश्वासनाची पूर्तत: केली नाही. त्यामुळे तासिका तत्त्वावरील आणि नेट-सेट अर्हताधारक उमेदवारांना तुटपुंज्या वेतनावर काम करावे लागत आहे, हीच खरी शोकांतिका आहे.
एमफीएल बेरोजगारांची समस्या वेगळीच
शासनाने प्राध्यापकांसाठी नेट-सेट परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य केले. काही शिक्षक एमफीएल उत्तीर्ण आहेत. शिक्षक व प्राध्यापकांनी मेहनत घेऊन ही परीक्षा उत्तीर्ण केली. मात्र, ही परीक्षा उत्तीर्ण होऊन जवळपास पंधरा वर्षांचा कालावधी झाला तरी त्यांना अद्यापही नियुक्ती आदेश देण्यात आलेले नाहीत.
राज्यात प्राध्यापकांची ३५ हजारांवर पदे रिक्त आहेत. पण, अद्यापही शासनाने प्राध्यापकांची पदभरती काढली नाही. त्यामुळे नेट-सेट उत्तीर्ण होऊनदेखील त्यांना तासिका तत्त्वावर काम करावे लागत आहे. त्यातही केवळ तीन ते चार महिन्यांचे नियुक्ती आदेश मिळत असल्याने त्यांची समस्या वेगळीच आहे.