गुरुजी शाळेत येतो आम्ही, पण बस आल्यावर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2021 05:00 AM2021-10-27T05:00:00+5:302021-10-27T05:00:52+5:30
ग्रामीण भागातील मुलींनी बसअभावी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शासनामार्फत मानव विकास योजनेंतर्गत बससेवा सुरू करण्यात आली आहे. भंडारा विभागांतर्गत असलेल्या साथ आगारात भंडारा गोंदिया जिल्ह्यातील विविध मार्गावर ९१ एसटी बस धावतात. मध्यंतरी कोरोनामुळे या बसचे नियोजन कोलमडले होते; परंतु कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली आणि आता शाळाही सुरू झाल्या. शाळा सुरू झाल्याने मानव विकासअंतर्गतच्या बस पूर्ववत सुरू करण्यात आल्या आहेत. या बसना ग्रामीण भागातील शालेय मुलीचाही प्रतिसाद मिळत आहे.
संतोष जाधवर
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : मानव विकास योजनेंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आजही एसटी बस धावत आहेत. शासनाने टप्प्याटप्प्याने शाळा, महाविद्यालये सुरू केल्याने अनेक विद्यार्थी एसटी बसने प्रवास करतात. त्यातच कोरोनाबाधितांची संख्याही कमी झाल्याने शालेय मुलींचाही या बसला प्रतिसाद मिळत आहे.
ग्रामीण भागातील मुलींनी बसअभावी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शासनामार्फत मानव विकास योजनेंतर्गत बससेवा सुरू करण्यात आली आहे. भंडारा विभागांतर्गत असलेल्या साथ आगारात भंडारा गोंदिया जिल्ह्यातील विविध मार्गावर ९१ एसटी बस धावतात. मध्यंतरी कोरोनामुळे या बसचे नियोजन कोलमडले होते; परंतु कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली आणि आता शाळाही सुरू झाल्या. शाळा सुरू झाल्याने मानव विकासअंतर्गतच्या बस पूर्ववत सुरू करण्यात आल्या आहेत. या बसना ग्रामीण भागातील शालेय मुलीचाही प्रतिसाद मिळत आहे.
कोरोना संसर्गामुळे गेल्या दीड वर्षापासून शालेय विद्यार्थी शाळेत गेले नव्हते. मात्र आता शासनाच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांसह पालकांना दिलासा मिळाला आहे. मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थीनींना शहराच्या ठिकाणी शाळा, महाविद्यालयात जाण्यासाठी अडचणी येत होत्या. मात्र आता एसटी महामंडळाने मानव विकास अंतर्गत असलेल्या बसेस सुरू केल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थीनींना दिलासा मिळत आहे. काही भागात कमी विद्यार्थ्यांची संख्या असली तरीही एसटी महामंडळ तोटा सहन करून ही योजना राबवित आहे. तर दुसरीकडे शासन मात्र एसटी महामंडळाला मदतीसाठी टाळाटाळ करत असल्याचे वास्तव आहे. शालेय विद्यार्थ्यांसह वयोवृद्ध नागरिकांना पास, सवलत तसेच तिकीटामध्ये सवलतीच्या विविध योजना एसटी महामंडळाकडून आजही सुरू आहेत.
मुख्याध्यापकांना एसटी अधिकाऱ्यांचे आवाहन
भंडारा आगारांतर्गत असलेल्या भंडारा, पवनी, तुमसर, साकोली, गोंदिया, तिरोडा आगारातून अनेक बस विद्यार्थ्यांसाठी धावत आहेत. मात्र काही भागात विद्यार्थ्यांच्या उपस्थितीअभावी बसेस धावत नाहीत. मानव विकास अंतर्गत भंडारा विभागातून सहा आगारातून ९१ बसेस आजघडीला धावत आहेत. याबाबत मुख्याध्यापकांना कोणतीही गरज भासल्यास आगार प्रमुखांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
मानव विकासच्या बसमुळे होते मदत...
आमच्या गावापासून शाळा तीस किलोमीटर अंतरावर आहे. एसटी बस नसल्याने यापूर्वी मुलीची गैरसोय होत होती; परंतु मानव विकास मिशनच्या बस सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आता आम्हा मुलींना होणारा त्रास कमी झाला आहे.
-नफिसा मुजावर, मोहाडी
ग्रामीण भागातील मुलींची शैक्षणिक गैरसोय दूर करण्यासाठी शासनाच्या वतीने मानव विकास मिशनच्या बस सुरू केल्या आहेत. या बसमुळे अनेक मुलींना महाविद्यालयात शिक्षणासाठी जाणे अधिक सोयीचे होत आहे. बस अशाच कायम सुरू राहाव्यात.
-माही गिरेपुंजे, खरबी नाका
मानव विकासअंतर्गत भंडारा आगारात ७, तिरोडा ७, गोंदिया २८ , साकोली २८, तुमसर १४, पवनी आगारात ७ अशा सहाही आगारांतर्गत मानव विकास मिशनच्या ९१ बस सुरू आहेत. अनेक विद्यार्थिनी याचा लाभ घेत आहेत. अधिक माहितीसाठी मुख्याध्यापकांनी आगारप्रमुखांशी संपर्क साधावा. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आणखी बस वाढवण्याचे नियोजन केले जात आहे.
-डॉ. चंद्रकांत वडस्कर, विभागीय वाहतूक अधिकारी, भंडारा.