जिल्ह्यात गुटखा बंदी कायदा नावालाच, खुलेआम होतेय विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 12:40 PM2024-08-28T12:40:31+5:302024-08-28T12:41:25+5:30

पानटपऱ्यांवरून अवैध विक्री : प्रशासन धडक मोहीम राबविणार का?

Gutkha is being sold openly in the district in the name of Ban Act | जिल्ह्यात गुटखा बंदी कायदा नावालाच, खुलेआम होतेय विक्री

Gutkha is being sold openly in the district in the name of Ban Act

लोकमत न्यूज नेटवर्क 
भंडारा :
जिल्ह्यात तंबाखू, गुटखा विक्री बंदीचा कायदा नावालाच दिसून येत आहे. शहरांसोबत गावागावांत खुलेआम पानटपऱ्यांवर तंबाखू व गुटख्याची विक्री होत आहे. एवढेच नव्हे तर शाळा परिसरालगत ही दुकाने खुलेआम सुरू आहेत. त्यामुळे प्रशासन धडक मोहीम राबविणार काय, असा प्रश्न आहे.


राज्यात २० जुलै २०१२ रोजी गुटखा बंदीचा निर्णय झाला. त्याला बारा वर्षे पूर्ण झाली; पण ना त्याची कडक अंमलबजावणी झाली, ना गुटखा विक्री थांबली. शहर किंवा ग्रामीणमधील पानटपरी, दुकानांमध्ये गुटख्याची विक्री होत आहे. गुटखा विक्री होत असतानाही कारवाई होताना दिसत नाही. आंतरराज्यीय सीमांवर पोलिसांचे तपासणी नाके असतानाही गुटखा येतोच कसा, या प्रश्नाचे ठाम उत्तर अधिकारी देऊ शकत नाहीत.


शहरामध्ये इतर राज्यांतून मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्रीला येतो. गुटखा बंदीनंतर अनेकांनी मावा विक्रीचा नवा व्यवसाय सुरू केला. त्यातूनच गुटख्याची विक्री सुरुवातीला चोरून केली जात होती. आता सर्रासपणे केली जात आहे. तरुणांना व्यसनाधीनतेपासून दूर ठेवून निरोगी, सदृढ समाजाच्या निर्मितीसाठी हातभट्टी दारू, गुटखा, मावा विक्रीवर कडक निर्बंध लावण्यात आले; पण शासकीय यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे कायद्याचे पालन होत नाही. जिल्ह्यात शहरच नव्हे, तर ग्रामीण परिसरात गुटखा विक्री सर्रासपणे पानटपरी, दुकानांमध्ये होते. गुटखा विक्रीसाठी व्यापाऱ्यांची मोठी साखळी कार्यरत आहे. ही साखळी तोडल्यानंतरच गुटखा विक्री कमी होण्यास मदत होणार आहे. कारवाईची धडक मोहीम हाती घेणे गरजेचे आहे.


शरीरावर परिणाम, मात्र नाद सुटता सुटेना 
तंबाखू, गुटख्याचे परिणाम अनेकांच्या आरोग्यावर झाले आहेत. गुटखा खाणाऱ्यांचे तोंड उघडत नाही. अनेकांना व्यवस्थित जेवणही करता येत नाही. आरोग्यावर विपरित परिणाम होत आहेत. तरुणांच्या आरोग्यावर तंबाखू, गुटख्याचे सर्वाधिक वाईट परिणाम दिसत असल्याचे कर्करोगतज्ज्ञ सांगतात. तरीपण, गुटखा, मावा खाणाऱ्यांना त्याचा नाद सुटता सुटत नसल्याचे दिसून येत आहे.


अवैध साखळी तोडण्याची गरज 
जिल्ह्यात मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्यांतून तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची आयात होते. अन्न व औषध प्रशासन, तसेच पोलिस विभागाकडून कित्येकदा कारवाया केल्या जातात. मात्र, त्यानंतरही त्यांची आवक व विक्री बंद होताना दिसत नाही. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची आयात व विक्री यांची मोठी साखळी असून, ती तोडण्यासाठी कठोर कारवायांची गरज आहे.


"व्यसन हा एकप्रकारचा मानसिक आजार आहे. तंबाखू, गुटखा खाण्याची तलब सुटता सुटत नाही. परंतु, प्रयत्न केले तर नक्कीच यश मिळते. तंबाखूचे व्यसन कर्करोगाला आमंत्रण देणारे आहे. कर्करोगाचा शेवट जीव गमावल्यानंतर होतो. त्यामुळे तरुणांनी व कुटुंबीयांनी तंबाखूच्या व्यसनापासून दूर राहावे. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या पाकिटावर त्याच्या दुष्परिणामांची माहिती छायाचित्राद्वारे दिली जाते."
- डॉ. रत्नाकर बांडेबुचे, मनोविकार तज्ज्ञ, भंडारा.

Web Title: Gutkha is being sold openly in the district in the name of Ban Act

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.