गुटख्याची खुलेआम विक्री
By admin | Published: December 23, 2015 12:34 AM2015-12-23T00:34:01+5:302015-12-23T00:34:01+5:30
तुमसर : गुटखा, मावा आदी पदार्थांसह संगंधित तंबाखूवर शासनाने बंदी घातली आहे. मात्र तुमसर शहरासह तालुक्यात गुटखा, तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम विक्री सुरू आहे.
बंदीचा उडाला फज्जा : तुमसरात पानटपरीवरून दररोज लाखोंची विक्री
तुमसर : गुटखा, मावा आदी पदार्थांसह संगंधित तंबाखूवर शासनाने बंदी घातली आहे. मात्र तुमसर शहरासह तालुक्यात गुटखा, तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम विक्री सुरू आहे. तालुक्यात या पदार्थांची दररोज लाखो रूपयांची विक्री होत आहे. तुमसर शहरासह तालुक्यात या पदार्थांची दररोज किमान पाच ते सहा लाख रूपयांची विक्री होत असावी, असा अंदाज वर्तविला जात आहे.
जिल्ह्यात तुमसरसह अन्य तालुक्यात मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे या सर्व शहरात मोठ्या प्रमाणात बंदी असलेले गुटखा, मावा आदी तंबाखूजन्य पदार्थ विकले जात आहे. तुमसरची बाजारपेठ मोठी आहे. शहराची लोकसंख्या ५० हजारांवर आहे. याशिवाय तालुक्यात १०० च्यावर गावे आहेत. तुमसर तालुक्याची लोकसंख्या अडीच लाखांवर आहे. या पसिरता आर्थिक सुबत्ता बऱ्यापैकी असून त्यातूनच व्यसनांचे प्रमाणही वाढत आहे. दररोज गुटखा, मावा, खर्रा आदी तंबाखूजन्य पदार्थ खाणारे हजारो नागरिक आहेत. बंदी असूनही सुगंधित तंबाखूचा खर्रा कुठेही सहज मिळत आहे. त्यामुळे तालुक्यात दररोज किमान दोन लाख गुटखा पुड्या, तीन पोते सुपारी व एक पोता तंबाखू विकला जात आहे.
बालकांपासून ते प्रौढ व्यक्तींपर्यंत गुटखा, खर्रा सेवन करणारे अनेक नागरिक आहेत. यात उच्चशिक्षित आणि शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्यांची संख्या मोठी आहे. त्याचबरोबर महाविद्यालयीन युवकांमध्येही गुटखा सेवनाचे प्रमाण वाढले आहे. तुमसर शहर व तालुक्यात बहुतांश पानटपऱ्यांवर गुटखा, खर्ऱ्यांची खुलेआम विक्री केली जाते. तालुक्यात किमान हजाराच्यावर पानठेले आहेत. या पानटपऱ्यांसोबतच काही किराणा दुकानांतूनही सर्रास गुटखा पुड्या आणि खर्ऱ्याची विक्री सुरू आहे. काही गुटखा, खर्रा सेवन करणाऱ्यांना पाचच्यावर गुटखा पुड्या अथवा खर्रा लागतात. सोबतच तंबाखू मिश्रित पान सेवन करणाऱ्यांचीही संख्या मोठी आहे. बंदी असल्यामुळे या पदार्थांचे दर वाढूनही खाणाऱ्यांची संख्या कमी नाही, ही आश्चर्यचकित करणारी बाब ठरली आहे.
गुटखा, खर्रा, मावा, सिगारेट, आदी तंबाखूजन्य पदाथार्मुळे तोंडात फोड येणे, रक्तदाब, हृदयरोग, अनुवांशिक प्रक्रियेतील अडथळे, तोंडाचा कर्करोग, क्षयरोग आदी रोगांची बाधा होण्याची दाट शक्यता असते. जगातील कर्करोगग्रस्तांमध्ये चार ते पाच टक्के नागरिकांना तोंडाचा कर्करोग झाल्याचे आढळतो. मात्र भारतात हेच प्रमाण तब्बल ३३ टक्के असल्याचे एका पाहणीतून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यासाठी गुटखा, मावा, खर्रा आदी तंबाखूजन्य पदार्थ चघळणे हे महत्त्वाचे कारण असल्याचे अभ्यासक सांगतात. तरीही तंबाखुजन्य पदार्थ चघळणाऱ्यांची संख्या मात्र कमी होत नाही, हे विशेष. (तालुका प्रतिनिधी)
कायद्यासोबतच जनजागृतीची गरज
तंबाखूजन्य पदार्थांचा वापर करणाऱ्यांना विविध २५ प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागण्याची शक्यता असते, असे डॉक्टर सांगतात. तरीही युवावस्थेपासून तंबाखुजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्यांची संख्या तालुक्यात लक्षणीय आहे. अशांपैकी वयाच्या २२ वर्षांआधीच मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या जादा असते, असे संशोधकांनी यापूर्वीच सिध्द केले आहे. त्यामुळेच शासनाने गुटखा, तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी लादली आहे. त्यासाठी खास कायदा केला आहे. तरीही तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. २५ आजारांचा शिरकाव होण्याची शक्यता आहे.
कायदा उरला कागदावरच
राज्य शासनाने गुटखा, सुंगंधित तंबाखू आदींवर कायदा करून बंदी लादली आहे. मात्र हा कायदा कागदावरच दिसून येत आहे. या कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अन्न व औषध प्रशासन विभागाला अद्याप ठोस कारवाई करण्यासाठी सवडच मिळात नाही. या कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी होत नसल्याने पानटपऱ्या, किराणा दुकानांतून खुलेआम गुटखा पुड्या व सुंगंधित तंबाखूजन्य खर्ऱ्याची विक्री सुरूच आहे.
अपुऱ्या मनुष्यबळाचा फटका
तंबाखूजन्य पदार्थांची पदार्थांची विक्री होत असल्यास या विभागाने कारवाई करणे गरजेचे आहे. तथापि, तोकड्या मनुष्यबळामुळे या विभागासमोर अडचणी आहेत. परिणामी अनेकदा पोलिसांनी गुटखा पकडून तो अन्न व औषध प्रशासन विभागाच्या ताब्यात दिला. मात्र आता पोलिसांची पकडही कमी झाल्याचे दिसत आहे. वर्षभरापूर्वी पोलिसांनी विविध ठिकाणी धाडी टाकून लाखोंचा गुटखा पकडला होता. बरेचदा शेतातही गुटखा साठवून ठेवल्याचे आढळले होते. मात्र त्यानंतर आता सर्वत्र सामसूम दिसत आहे.