जंगलव्याप्त दहेगाव शेतशिवारात रानगव्यांचा हैदोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:31 AM2021-02-15T04:31:27+5:302021-02-15T04:31:27+5:30
शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे नुकसान लाखांदूर: तालुक्यातील जंगलव्याप्त दहेगाव शेतशिवारात रानगव्यांच्या एका कळपाने हैदोस घातल्याने काही शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान ...
शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे नुकसान
लाखांदूर: तालुक्यातील जंगलव्याप्त दहेगाव शेतशिवारात रानगव्यांच्या एका कळपाने हैदोस घातल्याने काही शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सदर घटनेची माहिती लाखांदूर येथील वनपरिक्षेत्र विभागाला होताच या रानगव्यांना हाकलून लावण्यात संबंधित विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना यश आले आहे. प्राप्त माहितीनुसार गत दोन दिवसापूर्वी तालुक्यातील दिघोरी/मोठी वनक्षेत्रांतर्गत येणाऱ्या दहेगाव येथील शेतशिवारात जवळपास २० ते २५ रानगव्यांनी शिरकाव केला.
सदर शिरकाव होताना या शेतशिवारतील विविध कडधान्य व गवत पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची ओरड आहे. दरम्यान, मोठ्या झाडांचे जंगल असलेल्या दहेगाव परिसरात या प्राण्यांना आवश्यक चारा उपलब्ध होत नसल्याने सदर रानगव्यांनी शेतशिवाराकडे कूच केल्याची जोरदार चर्चा आहे. तर अन्य वन्यप्राण्यांनीदेखील उन्हाळ्यापूर्वीच गावाकडे कूच केल्याचे सांगितले जात आहे. तथापि, दोन दिवसापूर्वी रानगव्यांनी शेतशिवारात धुडगूस घातल्याने दहेगाव येथील तिकाराम डोंगरवार नामक शेतकऱ्यासह अन्य काही शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची बोंब आहे. सदर घटनेची माहिती पीडित शेतकऱ्यांनी लाखांदूर येथील वनविभागाला दिली असता येथील वनपरिक्षेत्राधिकारी रूपेश गावित, क्षेत्रसहायक जे. के. दिघोरे यांच्या मार्गदर्शनात वनरक्षक एस. जी. खंडागळेसह काही वनमजूर व गावकऱ्यांनी जंगल परिसरात जाऊन रानगव्यांना हाकलून लावल्याची माहिती देण्यात आली आहे. सदर घटनेत येथील वन विभागाने नुकसानग्रस्त शेतपिकाचे पंचनामे केले असून, शेतकऱ्यांना आवश्यक मदत उपलब्ध होण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली असल्याची माहिती देण्यात आली आहे.