वादळी पावसासह गारांचा वर्षाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:35 AM2021-04-21T04:35:29+5:302021-04-21T04:35:29+5:30
भंडारा : हवामान खात्याच्या अंदाजानुसार जिल्ह्यात मंगळवारी दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. पवनी तालुक्यातील अड्याळ आणि भंडारा तालुक्यातील जवाहरनगर ...
भंडारा : हवामान खात्याच्या अंदाजानुसार जिल्ह्यात मंगळवारी दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. पवनी तालुक्यातील अड्याळ आणि भंडारा तालुक्यातील जवाहरनगर परिसरात बोराच्या आकाराच्या गारांचा वर्षाव झाला, तर भंडारा शहरासह पालांदूर परिसरात पाऊस कोसळला. या अवकाळी पावसाने शेतकरी चांगलाच धास्तावला आहे.
मंगळवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास अचानक आकाशात ढगांची गर्दी झाली. काही कळायच्या आत विजांच्या कडकडाटात पावसाला सुरुवात झाली. भंडारा शहरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. भंडारा तालुक्यातील जवाहरनगर परिसरात दुपारी ३.३० वाजता वादळी पावसाला सुरुवात झाली. बोराच्या आकाराच्या गारांचा वर्षाव झाला. या वादळी पावसाने परिसरातील वृक्ष उन्मळून पडले तर काही भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. अड्याळ परिसरात दुपारी गारांसह पाऊस कोसळला. लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरातील मांगली बांध, देवरी गोंदी येथे गारांसह पाऊस कोसळला.
जिल्ह्यात चार दिवस पावसाचा इशारा
हवामान खात्याने जिल्ह्यात २१ ते २४ एप्रिलदरम्यान चार दिवस पाऊस कोसळण्याचा इशारा दिला आहे. पूर्व विदर्भातील काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.