गारपिटीच्या तडाख्याने धान पिकाच्या लोंबीतील दाणे जमिनीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:36 AM2021-05-12T04:36:21+5:302021-05-12T04:36:21+5:30
शेतकरी वर्गाचे सुमार नुकसान : हातातोंडाशी आलेले पीक मातीमोल पालांदूर : कोरोनाच्या संकटासोबतच शेतकरी वर्गाला अस्मानी संकटाचा सामना करावा ...
शेतकरी वर्गाचे सुमार नुकसान : हातातोंडाशी आलेले पीक मातीमोल
पालांदूर : कोरोनाच्या संकटासोबतच शेतकरी वर्गाला अस्मानी संकटाचा सामना करावा लागत आहे. आठवडाभरापासून निसर्गाचे दुष्टचक्र सुरू आहे. तुफान वादळवारा व गारपिटीसह पावसाने हजेरी लावली आहे. सोमवारी रात्री साडेसातच्या दरम्यान सुसाट वाऱ्यासह गारपिटीने धानपीक मातीमोल केले. यात हातातोंडाशी आलेले पिकाचे सुमार नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेताचे पंचनामे करून मदतीची अपेक्षा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
पालांदूर मंडळ कृषी कार्यालयांतर्गत उन्हाळी धानाचा हंगाम अंतिम टप्प्यात आलेला आहे. काही शेतांत कापणी, मळणी सुरू झालेली आहे. हातातोंडाशी आलेल्या पिकाला निसर्गाच्या दुष्टचक्राने लक्ष्य केले आहे. चार महिन्यांच्या मेहनतीनंतर हातात आलेले पीक मातीमोल झालेले पाहून शेतकरी गहिवरला आहे. पालांदूर मंडळांतर्गत जेवणाळा, घोडेझरी, मांगली, मचारना, पालांदूर, कन्हाळगाव आदी गावांत गारपिटीचा तडाखा अधिकच बसलेला आहे.
कच्च्या घरांचे नुकसानसुद्धा झालेले आहे. शेतकरी वर्ग आधीच कोरोनाच्या संकटाने आर्थिक विवंचनेत असताना दृष्ट निसर्गानेसुद्धा गारपिटीचा तडाखा देत आणखीनच संकटात टाकलेले आहे.
ऊन-पावसाचा खेळ सुरू असल्याने उभ्या असलेल्या धानातील लोंबीचे दाणे आपोआपच कापणी बांधणीच्या वेळी मातीत झडतात. लोंबिला धान झालेले असल्याने व त्यात नको असलेले दररोज पडणारे निसर्गाचे (पावसाचे) पाणी पिकाला हानिकारक ठरत आहे. दुपारचे ऊनसुद्धा धान झडायला कारणीभूत ठरत आहे. धान पिकून मातीमोल होत आहे.
कोट बॉक्स
दोन एकरात लावलेल्या उन्हाळी हंगामातील धान कापणीयोग्य आहे. जमिनीत ओलावा असल्याने चार दिवस वाट पाहत होतो. मात्र, काल झालेल्या गारपिटीने ५० टक्केच्या वर नुकसान झाले आहे. कृषी, महसूल विभागाने नुकसानग्रस्त शेताचे पंचनामे करून आम्हाला न्याय द्यावा.
जयदेव बेलखोडे, शेतकरी घोडेझरी (मेंगापूर)
गारपिटीने १६ एकरातील धानाचे नुकसान झाले. झालेला खर्चही निघणे कठीण आहे. नुकसानग्रस्त शेताची पाहणी करून नुकसानभरपाई द्यावी.
आनंदराव हटवार, शेतकरी घोडेझरी (पालांदूर)
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती कृषी साहाय्यक, ग्रामसेवक व तलाठी यांच्याकडे द्यावी. कृषी विभागाच्या वतीने सर्वे सुरू आहे. नुकसानग्रस्त शेतकरी सर्व्हेतून सुटू नयेत याकरिता नुकसानग्रस्तांनी माहिती पुरवावी.
पद्माकर गीदमारे, तालुका कृषी अधिकारी, लाखनी.