वादळी पावसासह गारपिटीने झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:29 AM2021-05-03T04:29:40+5:302021-05-03T04:29:40+5:30
▪ पिंपळगाव को परिसरातील शेतकरी संकटात लाखांदूर : हवामान खात्याच्या अंदाजानुसार गत १ मे रोजी रात्रीच्या सुमारास अचानक तालुक्यातील ...
▪ पिंपळगाव को परिसरातील शेतकरी संकटात
लाखांदूर : हवामान खात्याच्या अंदाजानुसार गत १ मे रोजी रात्रीच्या सुमारास अचानक तालुक्यातील काही भागांत झालेल्या वादळी पावसासह गारपिटीने २०० हेक्टर क्षेत्रातील उन्हाळी धानपीक नष्ट झाले आहे. सदर नुकसान तालुक्यातील पिंपळगाव, मडेघाट, चिचगाव, कन्हाळगाव परिसरात झाल्याची विश्वसनीय माहिती असून उन्हाळी धान उत्पादक शेतकरी प्रचंड संकटात सापडल्याची ओरड आहे.
यंदाच्या उन्हाळी हंगामात तालुक्यात ६ हजार ९५९ हेक्टर क्षेत्रात उन्हाळी धानपिकाची लागवड करण्यात आली आहे. सदर क्षेत्रात अर्धे अधिक क्षेत्र ईटियाहोह धरणांतर्गत तर उर्वरित क्षेत्र कृषी वीजपंप सुविधेंतर्गत सिंचित करून धानाची लागवड करण्यात आली आहे.
दरम्यान, सदर लागवडीअंतर्गत धानाचा मोठ्या प्रमाणात निसवा होऊन धानाच्या लोंबी भरण्याच्या मार्गावर असताना, तर काही धानपीक कापणीला आले असताना अचानक झालेल्या वादळी पावसासह गारपिटीने उभ्या धानपिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. १ मे रोजी रात्रीच्या सुमारास तालुक्यातील पिंपळगाव को परिसरातील पिंपळगाव, मडेघाट, चिचगाव, कन्हाळगाव आदी गावांतील जवळपास २०० हेक्टर क्षेत्रातील धानपीक पूर्णत: नष्ट झाले आहे.
नुकसानग्रस्त भागातील शेतातील धानाच्या लोंबीची धानबियाणे अक्षरश: जमिनीवर गारपिटीने गळून पडल्याने शेतात केवळ धानाची तणस शिल्लक असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.
दरम्यान, खरिपात पूर, अवकाळी पाऊस व किडरोगाने लागवडीखालील पिकाचे प्रचंड नुकसान झाल्याने सदरची हानी उन्हाळी हंगामात भरून काढण्याच्या उमेदीत शेतकरी असताना १ मे रोजी झालेल्या गारपिटीने हातात आलेले धानपीक नैसर्गिक आपत्तीने हिसकावल्याचे बोलले जात आहे.
बॉक्स :
भाजीपाला पिकासह आंब्याचे नुकसान
१ मे रोजी रात्रीच्या सुमारास झालेल्या अवकाळी वादळी पावसासह गारपिटीने तालुक्यातील पिंपळगाव को क्षेत्रात २०० हेक्टर क्षेत्रातील धानपिकाचे नुकसान होताना भाजीपाला पिकासह आंबा या फळाचेदेखील नुकसान झाले आहे. ऐन उतरणीला आलेल्या आंब्याच्या फळावर गारपीट व वादळी पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात फळे गळून पडली असून शेतकऱ्यांची प्रचंड हानी झाली आहे.
जिवंत तारांसहित विद्युतखांब कोसळले
तालुक्यातील पिंपळगाव को येथे १ मे रोजी वादळी पावसासह गारपीट झाल्याने स्थानिक पिंपळगाव टोली येथील जिवंत तारांसहित विद्युतखांब खाली कोसळले. मात्र, वीजप्रवाह खंडित झाल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
तालुका कृषी विभागांतर्गत क्षतिग्रस्त भागाचे सर्वेक्षण
१ मे रोजी रात्रीच्या सुमारास तालुक्यातील पिंपळगाव को परिसरातील पिंपळगाव, मडेघाट, चिचगाव, कन्हाळगाव आदी गावांत वादळी पावसासह गारपीट होऊन भाजीपाला पिकासह उन्हाळी धानपिकाच्या झालेल्या नुकसानीची तालुका कृषी विभागांतर्गत क्षतिग्रस्त भागाचे सर्वेक्षण सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनी केली नुकसानभरपाईची मागणी
गारपीट व वादळी पावसामुळे पिंपळगाव को क्षेत्रातील जवळपास २०० हेक्टर क्षेत्रातील धानपिकाचे नुकसान झाले आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे. याप्रकरणी शासनाने तत्काळ दखल घेऊन क्षतिग्रस्त भागाचे सर्वेक्षण व पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी जनतेतून केली जात आहे.