तुमसरात वीज खांबाने व्यापला अर्धा रस्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 10:39 PM2019-08-05T22:39:17+5:302019-08-05T22:39:32+5:30
शहरातील विनोबा नगरात अर्धा सीमेंट रस्ता व्यापून टाकणारा विजेचा खांब मागील सहा ते सात वर्षापासून उभा आहे. वळण रस्त्यावर हा खांब अतिशय धोकादायक असून वर्दळीच्या मार्गावर आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत अनेक तक्रारी संबंधित विभागाला केल्या. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. नवीन रस्ता बांधकामानंतर रस्त्याच्या बाजूला भराव न केल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : शहरातील विनोबा नगरात अर्धा सीमेंट रस्ता व्यापून टाकणारा विजेचा खांब मागील सहा ते सात वर्षापासून उभा आहे. वळण रस्त्यावर हा खांब अतिशय धोकादायक असून वर्दळीच्या मार्गावर आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत अनेक तक्रारी संबंधित विभागाला केल्या. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. नवीन रस्ता बांधकामानंतर रस्त्याच्या बाजूला भराव न केल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे.
विनोबा नगरात बावनथडी कॉलनी परिसरात सीमेंट रस्त्यावर विजेचा खांबाने अर्धा रस्ता व्यापला आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता येथे वर्तविण्यात येत आहे. या रस्त्याने विद्यार्थी परिसरातील नागरिकांची मोठी वर्दळ आहे. रात्री अंधारात खांबाला वाहने धडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. नवीन सीमेंट रस्ता बांधकाम करताना सदर विजेचा खांब हटविण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी वीज वितरण कंपनीकडे केली होती. आतापर्यंत अनेक निवेदने देण्यात आली. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. येथे एखादा अपघात घडल्यानंतर वीज वितरण कंपनी दखल घेणार काय] असा प्रश्न उपस्थित होत आहे. उच्चदाबाच्या वीज वाहिन्या सदर खांबावरून जात आहेत. नागरिकांच्या तक्रारींना येथे केराची टोपली दाखविली जात आहे, असा आरोप स्थानिक नागरिकांनी लावला आहे. सीमेंट रस्ता बांधकामानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूला मुरुम घालण्यात आले नाही. त्यामुळे वाहन अनियंत्रित होऊन अथवा रात्रीच्या सुमारास वाहन रस्त्याच्या खाली उतरून अपघाताची शक्यता आहे. रस्त्याखालील जागा मुरुमाने भराव करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.