अपंग शिक्षकाला ग्रामस्थाची मारहाण
By Admin | Published: April 7, 2017 12:35 AM2017-04-07T00:35:58+5:302017-04-07T00:35:58+5:30
भंडारा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या श्रीनगर येथे कार्यरत शिक्षक एस.जी. सामृतवार यांना शाळा व्यवस्थापन
श्रीनगर येथील घटना : चौकशीदरम्यान शालेय विद्यार्थ्यांचे नोंदविले बयाण
भंडारा : भंडारा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या श्रीनगर येथे कार्यरत शिक्षक एस.जी. सामृतवार यांना शाळा व्यवस्थापन समितीच्या माजी अध्यक्षाने मारहाण केली. हा प्रकार १ एप्रिल रोजी शाळेत घडला. याप्रकरणी शिक्षण विभागाने शाळेतील विद्यार्थ्यांचे बयाण नोंदविले आहे. या प्रकारामुळे शिक्षकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्रीनगर येथे एस.जी. सामृतवार हे २६ जून २०१२ पासून कार्यरत आहेत. ते डाव्या हाताने अपंग आहेत. ते या शाळेत रूजू होण्यापूर्वी शाळेचे वीज देयक न भरल्याने विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला होता. ते भरण्यासाठी शिक्षक सामृतवार यांनी तत्कालीन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कैलाश थोटे यांच्याकडे ६ हजार रुपये दिले होते. सदर बिलाचा भरणा त्यांनी केला. मात्र ती रक्कम ३५०० रु. असल्याने उर्वरित रक्कम परत न करता त्यात अफरातफर केली. याबाबत विद्यमान शाळा व्यवस्थापन समितीने शिक्षक सामृतवार यांना रकमेबाबत विचारणा केली असता थोटे यांनी ती दिली नसल्याचे सांगितले. या प्रकारावरून थोटे यांनी शिक्षक साम्रृतवार यांना माझी गावात बदनामी करीत आहात असे म्हणून १ एप्रिल रोजी शाळेतच मुलांसमोर हात बुक्क्यांनी जबर मारहाण केली. ही बाब ग्रामस्थांना माहित होताच त्यांनी तातडीने सामृतवार यांना यातून सोडविले. याबाबत सामृतवारयांनी अड्याळ पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. शिक्षक हे अपंग प्रवर्गात मोडत असतानाही त्यांना पोलिसांनी सहकार्य केलेले नाही. याची तक्रार प्राप्त होताच जिल्हा परिषद शिक्षण विभागाने केंद्रप्रमुख रजनी पवार व विस्तार अधिकारी के.पी. टेंभुर्णीकर यांना चौकशीचे आदेश दिले. बुधवारला या दोघीही शाळेत चौकशीसाठी गेले असता त्यांच्यासमोरच कैलाश थोटे व त्याच्या पत्नीने अश्लिल शब्दात शिवीगाळ करून विनयभंगाची तक्रार दाखल करण्याची धमकी दिली. या प्रकरणी शिक्षकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी अद्याप कुठलीही कारवाई केली नसल्याने जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये असंतोष पसरला आहे. (शहर प्रतिनिधी)