धावपटू पौर्णिमासाठी सरसावले मदतीचे हात
By admin | Published: October 4, 2016 12:35 AM2016-10-04T00:35:27+5:302016-10-04T00:35:27+5:30
जिल्हा व विभागीय शालेय स्पर्धात चमकदार कामगिरी करणारी,...
अनेकांनी केले सहकार्य : महेंद्र शेंडे यांच्या पुढाकाराला प्रतिसाद
करडी (पालोरा) : जिल्हा व विभागीय शालेय स्पर्धात चमकदार कामगिरी करणारी, जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय करडीची वर्ग ११ वी ची विद्यार्थिनी पौर्णिमा तुळशीदास खंडेरे रा.करडी हिला सहा महिन्यापूर्वी हाडांचा कॅन्सर झाला. मजुरी करून पोट भरणाऱ्या आई वडील इलाजासाठी काळजीत पडले होते. माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र शेंडे यांच्या पुढाकाराने अनेकांनी मदतीचा हात दिला. नुकतेच मेडीकल कॉलेज नागपूर येथे शस्त्रक्रिया करण्यात येवून एक पाय कापावा लागल्याने ती धावपटू अभागी ठरली.
करडी येथील पौर्णिमा तुळशीराम खंडेरे (१७) हिने अनेक शालेय स्पर्धा गाजविल्या. जिल्हा व विभागीय स्पर्धात सर्वोत्तम कामगिरी केली. पदके पटकाविली. त्यामुळे परिसरात ती पट्टीची धावपटू म्हणून ओळखली जायची. पौर्णिमाचे प्राथमिक व हायस्कुल पर्यंतचे शिक्षण करडी गावातूनच झाले. शिक्षणात ती हुशार, तशीच खेळात विशेष गोडी असल्याने गरीबीत जगत असताना तिने खेळाची आवड जोपासली. अनेक शालेय स्पर्धात तिने करडी जिल्हा परिषद हायस्कुलचे नेतृत्व केले. जिल्हा व विभागीय स्पर्धा गाजविल्या. शाळेचा लौकीक वाढविला. त्यामुळे अल्पवयात तिने धावपटू म्हणून मानाचे स्थान मिळविले.
आई वडील मजुरी करणारी असून लहान भाऊ प्रवीण वर्ग ९ वीचा विद्यार्थी आहे. घरची परिस्थिती अतिशय नाजकू अशातच तिला सहा महिन्यापूर्वी उजव्या पायाला हाडांचा कॅन्सर झाला. सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचार घेतला. मात्र लाभ झाला नाही. माजी जि.प. सदस्य महेंद्र शेंडे सामाजिक दातृत्वाची भावना बाळगून तीन महिन्यांपासून तिच्या पाठीशी उभे राहिले व मदत दिली. कॅन्सरची तीव्रता वाढल्याने सामान्य रुग्णालयाने तिला मेडीकल कॉलेज नागपूर येथे हलविण्याचा सल्ला दिला. मेडीकलच्या डॉक्टरांनी तिचा पाय कापावा लागेल, अन्यथा तिच्यावर मृत्यू ओढवेल अशी माहिती दिली. शस्त्रक्रियेदरम्यान रक्ताची गरज भरून काढण्यासाठी शेंडे यांच्यासह तेजराम नेरकर, राजू लोंदासे, अजय शहारे, प्रकाश तुमसरे, विजय तुमसरे, संतोष चामलाटे यांनी रक्तदान केले. कृत्रीम पाय व आरोग्य योजनेतून मदत देण्याचे आश्वासन यावेळी खासदार नाना पटोले यांनी दिले. (वार्ताहर)