मेळाव्याचे उद्घाटन शेतकरी विधवेच्या हस्ते करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 09:52 PM2019-02-12T21:52:02+5:302019-02-12T21:52:22+5:30
तालुका निर्मितीचा प्रश्न चिघळत असताना तालुका कृती संघर्ष समितीने आदर्श उपस्थित करीत १४ तारखेला होऊ घातलेल्या तालुकास्तरीय कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन शेतकरी विधवा महिलेच्या हस्ते करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. दरम्यान कृती समिती तालुका निर्मितीबाबत व मतदानावर बहिष्कार घालण्याबाबतही ठाम आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अड्याळ : तालुका निर्मितीचा प्रश्न चिघळत असताना तालुका कृती संघर्ष समितीने आदर्श उपस्थित करीत १४ तारखेला होऊ घातलेल्या तालुकास्तरीय कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन शेतकरी विधवा महिलेच्या हस्ते करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. दरम्यान कृती समिती तालुका निर्मितीबाबत व मतदानावर बहिष्कार घालण्याबाबतही ठाम आहे.
१४ फेब्रुवारीला कृषी विभाग, पंचायत समिती पवनी, जिल्हा परिषद भंडारातर्फे अड्याळ येथील बाजार ग्राऊंड परिसरात तालुकास्तरीय कृषी प्रदर्शनी व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामस्थांनी अड्याळ तालुका निर्मिती संदर्भात जिल्हा प्रशासनासह शासनाला १४ दिवसांचा अल्टीमेटम दिला होता. ती मुदत १५ फेब्रुवारीला संपत आहे. परिणामी काळ्या फिती लावून निदर्शने करणे, लोकप्रतिनिधींना गावबंदी, मतदानावर बहिष्कार आदी निर्णय समितीने घेतला आहे. विशेष म्हणजे या निर्णयाचा काटेकोरपणे पालन करण्यात येत असून १४ तारखेला होवू घातलेल्या मेळाव्यात लोकप्रतिनिधींना येण्यासही आम्ही रोखू असा ठाम निर्णय समितीने घेतला आहे. या मेळाव्यात लोकप्रतिनिधीं ऐवजी कार्यक्रमाचे उद्घाटन शेतकरी विधवा महिलेच्या हस्ते करण्यात यावे, अशी मुख्य मागणी समितीच्यावतीने करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी खासदार मधुकर कुकडे, आमदार डॉ. परिणय फुके, आमदार रामचंद्र अवसरे आदी मान्यवर येणार असल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे तीन दशकांपासून अड्याळ तालुका निर्मितीचे स्वप्न उराशी बाळगून असलेल्या ग्रामस्थांनी एल्गार पुकारला आहे.
दरम्यान तालुकास्तरीय कृषी प्रदर्शनी व शेतकरी मेळाव्याला ग्रामस्थांचा विरोध नाही. मात्र सोहळ्याला उपस्थित राहणारे उद्घाटक व अतिथींचा विरोध होताना दिसत आहे. १२ दिवसांचा कालावधी लोटत असतानाही तालुका निर्मितीबाबत कुठल्याही हालचाली शासन स्तरावर झाल्या नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे.