स्टेअरिंगवरील हात स्थिरावले शेतीकामात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2020 05:00 AM2020-08-23T05:00:00+5:302020-08-23T05:00:54+5:30
धनवंत चामलाटे रा.पलाडी असे या चालकाचे नाव आहे. ते एसटी महामंडळात नियमित बसचालक म्हणून कार्यरत होते. सुमारे २५ वर्ष निष्णात हातांनी शेकडो प्रवाशांना त्यांनी आपल्या गावापर्यंत पोहचविले होते. मात्र कोरोनाचे संकट आले. २२ मार्चपासून एसटीची चाके थांबली. सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. जगण्यासाठी एकच पर्याय उरला. तो म्हणजे शेती. आपल्या वडीलोपार्जीत शेतीत भाजीपाला पीक घेण्याचे नियोजन केले.
संतोष जाधवर।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोना संसर्गाचा परिणाम जाणवायला लागला आहे. अनेकांचा रोजी रोटीचा व्यवसायही बंद झाला. नोकरीवर असणाऱ्यांना घरी पाठविण्यात आले. जीवन जगण्यासाठी व्यवसाय बदलून संघर्ष सुरु झाला. असाच संघर्ष एसटी महामंडळातील चालकाच्या वाट्याला आला. महामंडळाने सक्तीच्या रजेवर पाठविले. मात्र त्याने स्वस्थ न बसता शेतीत वेळ घालविणे सुरु केले. भाजीपाला उत्पादनातून आर्थिक स्थिती सावरण्याचा प्रयत्न चालविला. निष्णातपणे एसटीबस ते स्टेअरिंग सांभाळणारे हात आता शेतीव्यवसायात स्थिरावले आहेत.
धनवंत चामलाटे रा.पलाडी असे या चालकाचे नाव आहे. ते एसटी महामंडळात नियमित बसचालक म्हणून कार्यरत होते. सुमारे २५ वर्ष निष्णात हातांनी शेकडो प्रवाशांना त्यांनी आपल्या गावापर्यंत पोहचविले होते. मात्र कोरोनाचे संकट आले. २२ मार्चपासून एसटीची चाके थांबली. सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. जगण्यासाठी एकच पर्याय उरला. तो म्हणजे शेती. आपल्या वडीलोपार्जीत शेतीत भाजीपाला पीक घेण्याचे नियोजन केले. पाऊण एकरात भाजीपाला पिकाची लागवड केली. राष्ट्रीय महामार्गावर त्याची विक्री सुरु झाली. या काळात ७० ते ८० हजार रुपये निव्वळ नफा मिळाला. ते एवढ्यावरच थांबले नाही. आपल्या शेतातील आंब्याची योग्य देखरेख केली. उन्हाळ्यात आंब्याचे भरघोस उत्पन्न आले. त्यातूनही ८० हजाराचा नफा झाला. उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड यांनी चालकाच्या उद्यमशीलतेचे कौतूक केले.
राष्ट्रीय महामार्गावरून प्रवासी करत असताना भाजीपाला खरेदीच्या निमित्ताने चामलाटे यांचा परिचय झाला. कोणत्या वेळी कोणती पिके घ्यायची व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यावर मार्गदर्शन करण्यात आले. वारंवार भेटी होत गेल्या. आधुनिक शेतीची कास धरली तर शेतकऱ्यांची प्रगती आजही निश्चितच होऊ शकते हे धनीवंत चामलाटे यांच्या उदाहरणावरून दिसून येते. शेतकºयांनी आदर्श घेण्याची गरज आहे.
-होमराज धांडे, मंडळ कृषी अधिकारी पहेला
निवृत्तीनंतर पूर्ण वेळ शेती करणार
भंडारा आगारात असलेले धनवंत चामलाटे यांच्या निवृत्तीला आता दीड वर्ष बाकी आहे. निवृत्तीनंतर पूर्ण वेळ शेती करण्याचा मनोदय त्यांनी केला आहे. कोरोनाने जगावर संकट आले असले तरी एका चालकाला मात्र कोरोनाने शेती व्यवसायात आणून अर्थार्जनाचा नवा मार्ग दाखविला. लॉकडाऊनने आपल्याला चांगलेच शिकविले. शेतीसाठी त्यांना तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, मंडळ अधिकारी होमराज धांडे यांनी मार्गदर्शन केले. आता त्यांनी पाच एकर क्षेत्रात धानाची लागवड केली आहे. भाजीपाला व इतर शेतीपिकातून उत्पन्न चांगले मिळू शकते हे आपल्या अनुभवातून कळले. एसटीची नोकरी करताना शेती करणे शक्य नव्हते. लॉकडाऊन झाले नसते तर निवृत्तीनंतर घरी बसून राहलो नसतो. आता शेतीत पूर्णवेळ राबणार असल्याचे चामलाटे यांनी सांगितले.