बाहुला-बाहुलीच्या लग्नात आनंदाची उधळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 10:43 PM2018-06-04T22:43:00+5:302018-06-04T22:43:00+5:30
लहानपणी भातकुलीचा खेळ प्रत्येकांनी खेळला आहे. त्या खेळातील आपुलकी सर्वांना सामावून घेण्याची ती मजा आता दुर्मिळच झत्तली. तथापि, ग्रामीण भागात या बालपणीच्या खेळाला विस्तारित रूप देवून पालडोंगरी येथील गावकऱ्यांनी सामाजिक एकता व संस्कृतीचे जतन केले. या बाहुल्यांच्या लग्नात अख्खा गाव सहभागी होत आनंदाची उधळण केली.
राजू बांते।
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : लहानपणी भातकुलीचा खेळ प्रत्येकांनी खेळला आहे. त्या खेळातील आपुलकी सर्वांना सामावून घेण्याची ती मजा आता दुर्मिळच झत्तली. तथापि, ग्रामीण भागात या बालपणीच्या खेळाला विस्तारित रूप देवून पालडोंगरी येथील गावकऱ्यांनी सामाजिक एकता व संस्कृतीचे जतन केले. या बाहुल्यांच्या लग्नात अख्खा गाव सहभागी होत आनंदाची उधळण केली.
बाहुला-बाहुलीचा लग्न हा लहानग्यांचा बालपणातील आवडता खेळ. प्रत्येक मुलगी बालपणी हा खेळ खेळायची. बालपणातील लहान भांड्यात तयार होणारे जेवण, हिरव्या पानाच्या चपात्या, वरण आदी पदार्थ तयार करणे, शिंप्याच्या घरून आणलेल्या नवीन उपयोगीहीन कापडांचे तुकडे. त्या तुकड्यांच्या सहायाने केलेले बाहुला-बाहुली करंजीच्या पानाची सनई, फुटलेल्या माठाच्या वरच्या भागावर कागद लावून बनविलेला डफ एकूणच भातुकलीच्या खेळात बालपणीचा आनंद लुटला जात होता. स्मार्ट फोन, व्हिडीओ गेम यामध्ये अलिकडचे मुले रमू लागली. पण, या खेळाला लोकाश्रय व बालपणीच्या आठवणी जाग्या करण्याचे तसेच संस्कृती संवर्धनाचे महत्तम कार्य पालडोंगरी या गावात करण्यात आले. राजकुमार वरकडे यांनी या भातुकलीच्या खेळाला वास्तव रूप देत जंगी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शोभाराम उताने, राधेश्याम खराबे, गुलाब टाले, रमेश डहाके, भिवाजी सेलोकर, देवदास मसर्के या पुरूषांनी तर अनिता मोहतुरे, देवांगना खंडाते, संगीता ढवळे, मंगला नामुर्ते, प्रभा खराबे, उर्मिला मोहतुरे, तारा डहाके, चंद्रभागा खराबे या महिलांनी पुढाकार घेतला. गावाला विकासाची दिशा देणारे प्रकाश खराबे, सरपंच सुरेखा खराबे, उपसरपंच सुधाकर डहाके, उदेलाल पुडके, शिवशंकर टाले, सुनिता वरकडे, उषा सव्वालाखे, कल्पना कायते, शिशुपाली रामटेके या गाव प्रमुखांनी सहकार्याचे हात दिले. अगदी, वास्तव वाटावा असा बाहुला बाहुलीचा सोहळा पार पाडला. राजकुमार वरकडे वराचे पिता व मामा गुलाब टाले झाले होते. वधूचे पिता रमेश डहाके व मामा भीवा सेलोकर झाले होते. जानोसा प्रकाश टाले यांचे घरी ठेवण्यात आला होता. गोरज मुहूर्तावर डी.जे. वाजवत वरकडे यांच्या घरून वरात काढण्यात आली. नाचत धुंद होत वरात नवरीच्या घरी पोहचली. अक्षता व मंगलाष्टके झाली. फटाके फोडले गेले. गावात गोड जेवण देण्यात आले. गावातील सर्व जाती, धर्माच्या लोकांनी यात सहभाग घेतला होता. दुसºया दिवशी स्वागत भोजनाचे आयोजन गुलाब टाले यांचे घरी करण्यात आले. देखणा असा भातुकलीचा सोहळा पालडोंगरी गावातील लोकांनी अनुभवला.
भातुकलीचा पुन्हा एकदा डाव मांडण्याची संधी मिळाली. आपुलकी व बालपणीचा खेळ मांडता आला. या खेळामुळे लहान बालकांना छान संदेश जाण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे.
-सुरेखा खराबे,
सरपंच, पालडोंगरी.