मेंढा, गढपेंढरीत हर घर नळ, गावकरी मात्र तहानलेलेच !
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 12:53 PM2024-05-03T12:53:10+5:302024-05-03T12:54:47+5:30
ऐन उन्हाळ्यात संकट : ग्रामस्थांनी दिला उपोषणाचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी: तापमानाचा पारा चढला असून, ग्रामीण भागात दैनंदिन गरजेपुरते पाणी मिळणेही कठीण झाले आहे, तर काही गावांत घरी नळ लावून ठेवले, पण तेही शोभेचे ठरत आहे. नागरिक तहानलेलेच असल्याचे चित्र लाखनी तालुक्यातील मेंढा, गढपेंढरी येथे बघायला मिळत आहे.
लाखनी तालुक्यातील पोहरा या गट ग्रामपंचायतींतर्गत येत असलेल्या मेंढा, गढपेंढरी या गावात मागील काही महिन्यांपूर्वी हर घर नल योजनेंतर्गत नळ बसविण्यात आले. त्यामुळे ग्रामस्थांना वाटले की या उन्हाळ्यात तरी पाण्याचे संकट येणार नाही. मात्र कंत्राटदाराच्या उदासीन धोरणामुळे हे दोन्ही गावभर उन्हाळ्यातही तहानलेले आहेत.
गावात पाण्याचे इतर स्त्रोत नाहीत. त्यामुळे अनेक कुटुंबांना पिण्यासाठी पाणी अनेक किमी अंतराहून आणावे लागत आहे. परिणामी ग्रामस्थांमध्ये आक्रोश निर्माण झाला आहे. तत्काळ पाण्याची सुविधा उपलब्ध करून न दिल्यास उपोषण करण्याचा इशाराही आता ग्रामस्थांनी दिला आहे.
नळ योजना ठरली पांढरा हत्ती
शासन मोठ्या प्रमाणत 'हर घर नल, हर घर जल' योजनेचा गाजावाजा करताना दिसत आहे. मात्र अनेक गावांत या योजनेची अंमलबजावणी पूर्णपणे झालेली नाही, तर काही ठिकाणी संथगतीने काम होत आहेत. मेंढा, गढपेंढरी या गावात काही महिन्यांपूर्वी काम झाले आहे, आता मात्र थोडे काम बाकी असताना कंत्राटदाराकडून हे काम पूर्ण करण्यास विलंब होत असल्याचा आरोप गावकरी लावत आहे. पाण्याची अत्यंत गरज असताना ही नळ योजना पांढरा हत्ती ठरत आहे.
गत काही महिन्यांपूर्वी नळ लावण्यात आले. जलकुंभाचे बांधकाम करण्यात आले, मात्र अद्यापही नळाला पाणी आले नाही. उन्हाळा सुरू आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही, मात्र प्रशासन सुस्त आहे. अधिकाऱ्यांनी ही समस्या मार्गी लावावी, अन्यथा ग्रामस्थांच्या पुढाकारातून आंदोलन करण्यात येईल.
- रोहित साखरे, सामजिक कार्यकर्ता
मेंढा, पोहरा येथे कंत्राटदाराला काम सुरू करण्याबद्दल ग्रामपंचायतकडून सूचना देण्यात आल्या आहेत. लगेच कामाला सुरुवात होत आहे. परिसरात पाण्याची पर्यायी व्यवस्था आहे. वाढत्या तापमानामुळे पाण्याची पातळी खोल गेली आहे. सदर नळ योजना तत्काळ सुरू करण्याची कारवाई केली जात आहे.
- रामलाल पाटणकर, सरपंच, पोहरा