हरिनामाच्या गजराने दुमदुमले मानेगाव
By admin | Published: December 23, 2015 12:43 AM2015-12-23T00:43:22+5:302015-12-23T00:43:22+5:30
येथे ग्रामवासियांच्या पुढाकाराने हनुमान मंदिर, ग्रामपंचायत व ग्रामविकास वाचनालयाचया भव्य प्रांगणावर भक्तीमय वातावरणात भागवत सप्ताहाचे उद्घाटन झाले.
मानेगाव बाजार : येथे ग्रामवासियांच्या पुढाकाराने हनुमान मंदिर, ग्रामपंचायत व ग्रामविकास वाचनालयाचया भव्य प्रांगणावर भक्तीमय वातावरणात भागवत सप्ताहाचे उद्घाटन झाले. त्या क्षणापासून बस स्टॅड- बाजारपरिसरातून शेवटच्या अंबामातामंदिरापर्यंत मानेगावात पंढरी अवतरली असून ब्रम्हमुहूर्तावर पहाटे व सायंकाळी ५ वाजता ह.भ.प. सोपान महाराज आळंदीकर यांच्या कर्णमधूर वाणीने श्रीमद् भागवत कथा पारायण प्रवचनाने पंचक्रोशीतून येणारे भाविक महिला-पुरुष मंत्रमुग्ध होतात.
एकंदरीत भागवत सप्ताहादरम्यान दररोज काकडा आरती, रामधून, हरीपाठ, भजन, किर्तन, भागवत कथा पारायण व प्रवचनाने भक्तीरस हरीनामाच्या गजरात संपूर्ण मानेगाव नगरी दुमदुमली आहे.
संपूर्ण गावातून मुख्य रस्त्याच्या दुतर्फा व दारांपुढे रांगोळी व तोरण-पताकांनी गाव सजविण्यात आले आहे.
परिसरातील गावांमधून भाविक स्त्री-पुरुंषाची वर्दळ मानेगावातील हरीनाम स्थळाकडे सकाळ-सायंकाळ आवागमन करतांना त्यांचा आनंद- उत्साह ओसंडून वाहतांना दिसत आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुध्दा भागवत सप्ताहाच्या समारोपप्रसंगी भव्य रामधून-घाघर-शोभायात्रेचे तसेच गोपालकाला व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
पंचक्रोशीतील बहुसंख्य भागवत प्रेमी भाविकांनी संपूर्ण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन भागवत सप्ताह समिती, हनुमान मंदिर देवस्थान समिति व समस्त ग्रामवासियांच्या वतीने पोलिस पाटील धनराज शेंद्रे, वयोवृध्द समर्पित ह.भ.प. शंकरराव ढोमणे महाराज व सरपंच प्रभाकर बोदेले यांनी केले आहे. (वार्ताहर)