हरदोली ७८ क्विंटल धानाचा अवैध साठा
By admin | Published: December 2, 2015 12:32 AM2015-12-02T00:32:48+5:302015-12-02T00:32:48+5:30
हरदोली (सिहोरा) येथील एका शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर ७८ क्विंटल ६० किलोग्रॅम धानाचा अवैध साठा आढळल्याने ...
तहसीलदार पथकाची कारवाई : धान केंद्राचे गोदामाला सील
तुमसर : हरदोली (सिहोरा) येथील एका शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर ७८ क्विंटल ६० किलोग्रॅम धानाचा अवैध साठा आढळल्याने तुमसर येथील तहसीलदार व पथकाने धान गोदाम सील केले. या प्रकरणाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येणार आहे. तहसीलदारांनी केंद्राला भेट देऊन चौकशी केली.
हरदोली (सिहोरा) येथे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र आठवड्यापूर्वी सुरू करण्यात आले. या धान खरेदी केंद्रावर धानाचा अवैध साठा उपलब्ध असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातून तुमसर तहसीलदारांना चौकशी करण्याचे निर्देश मिळाले.
शनिवारी रात्री ८ वाजता नायब तहसीलदार एन.पी. गौंड, मंडळ अधिकारी एन.पी. तुरकर व दोन पोलीस शिपाई हरदोलीत पोहोचले. धान खरेदी केंद्रातील गोदामाची तपासणी केली त्यात सन २०१४ मधील १८९ धानाचे कट्टे ७८ क्विंटल ६० किलोग्रॅम धानाच्या साठा आढळला. जुने धान व जुना बारदाना असल्याने हा साठा सील करण्यात आला. तहसीलदार सोनवाने, नायब तहसीलदार एच.एस. मडावी, एन.पी. गौंड यांनी भेट देऊन तपासणी केली. हा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करणार आहे. चौकशीत मील मालकाने आधारभूत धान खरेदी केंद्रावरून धानाची उचल केली नाही, अशी माहिती ग्रेडरने दिली. नायब तहसीलदारांनी धान गोडावून सील केले तेव्हा येथील ग्रेडर व व्यवस्थापक उपस्थित नव्हते. मागीलवर्षी भंडारा जिल्ह्यात धान घोटाळा झाल्याचे उघडकीस आले होते. त्याची एसआयटीमार्फत चौकशी सुरू आहे. जिल्ह्यात २९ आरधभूत खरेदी केंद्र सुरू असून तुमसर व मोहाडी तालुक्यात २५ धान खरेदी केंद्र सुरू आहे. शासकीय यंत्रणा असताना धानाची साठेबाजी कशी केली जाते हे अनुत्तरीत आहे. मागीलवर्षीच्या प्रकरणाशी संबंध आहे का? त्याचा तपास येथे केला जाणार आहे. एक वर्षापर्यंत धानाचा साठा कसा राहिला यावर तपास यंत्रणेचे लक्ष आहे. (तालुका प्रतिनिधी)