लंडनच्या हॅरिसने घातला पवनीच्या महिलेला गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2020 05:00 AM2020-11-06T05:00:00+5:302020-11-06T05:00:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : लॅपटॉप, ॲपल कंपनीचा मोबाईल, सोन्याचा हार, अंगठी असे गिफ्ट लकी ड्रॉत लागल्याचे आमिष देत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : लॅपटॉप, ॲपल कंपनीचा मोबाईल, सोन्याचा हार, अंगठी असे गिफ्ट लकी ड्रॉत लागल्याचे आमिष देत लंडनच्या लुकॉस हॅरिसन या व्यक्तीने पवनी येथील एका महिलेला गंडा घातला. विमानतळावरील पार्सल सोडविण्यासाठी ऑनलाईन पैसे घेतल्यानंतर पार्सलमध्ये आक्षेपार्ह वस्तु आढळल्याचे सांगत अटकेची भीती दाखविली. तसेच आणखी पैशाची मागणी करून महिलेची फसवणूक केली. या प्रकरणी पवनी पोलीस ठाण्यात चार व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पवनी येथील पद्मा वॉर्डात शोभना राजेश्वर गौरशेट्टीवार राहतात. १ नोव्हेंबर रोजी त्यांच्या मोबाईलवर कॉल आला. लंडन येथुन लुकॉस हॅरिसन (३२) बोलत असल्याचे सांगितले. त्याने तुमचा लकीडॉमध्ये नंबर लागला आहे. त्यात लॅपटॉप, ॲपल कंपनीचा मोबाईल, सोन्याचा हार, अंगठी, हँडबॅग आणि इतर साहित्य असल्याचे सांगितले. सर्व गिफ्ट तुमच्या घराच्या पत्यावर तेही मोफत येणार असेही सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. त्यानंतर काही वेळात एका अज्ञात महिलेचा फोन आला. तुमचे गिफ्ट दिल्ली विमानतळावर आले आहे. गिफ्ट हवे असेल तर तुम्हाला तात्काळ ३५ हजार रुपये भरावे लागतील असे सांगितले. एवढ्या मोठ्या किमतीचे गिफ्ट लागले असून ३५ हजार रुपयांसाठी मागे पुढे पाहू नका असेही त्यांना सांगण्यात आले. गिफ्ट हवे असेल तर दीपक वर्मा रा.सी ४-८४ ए यमुना विहार न्यू दिल्ली यांच्या खात्यावर तात्काळ पैसे पाठवावे लागेल असे सांगितले. यावर विश्वास ठेवत शोभना यांनी बँकेतून त्यांच्या खात्यात पैसे भरले. त्यानंतर फ्रांसिस नावाच्या फास्ट डिलर कंपनीच्या मॅनेजरचा फोन आला. तुम्ही पैसे जमा केले आहेत काय? अशी विचारणा केली. त्यावरुन शोभना यांनी दीपक वर्मा यांच्या व्हॉटस्ॲपवर पैसे भरल्याची पावती पाठविली. त्यानंतर पुन्हा अज्ञात महिलेचा फोन आला. तुमचे पैसे जमा झाले. लवकरच तुम्हाला गिफ्ट मिळेल असे सांगितले. आपल्याला मोठे गिफ्ट मिळणार असल्याचा आनंदात असताना पुन्हा त्या अज्ञात महिलेचा फोन आला. तुमचे पार्सल विमानतळावर चेक करण्यात आले. त्यात डॉलर आणि काळे पैसे आढळून आले. दिल्ली पोलिसांकडे प्रकरण गेले तर तुम्हाला अटक होईल अशी भीती दाखविली. तुम्हाला यातून वाचायचे असेल तर दीड लाख रुपये भरावे लागतील. असे सांगितले. एकदा ३५ हजार रुपये भरल्यानंतर पुन्हा दीड हजाराची मागणी होत असल्याने आपली फसवणुक झाल्याचे शोभना यांच्या लक्षात आले.
त्यांनी हा प्रकार आपल्या घरी सांगितला. त्यानंतर पवनी पोलीस ठाणे गाठुन तक्रार दिली. प्रभारी ठाणेदार महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक कुळकर्णी यांनी तक्रार नोंदवुन घेतली. त्यावरुन आरोपी लुकास हॅरिसन रा.लंडन. अज्ञात महिला. दीपक वर्मा. फ्रान्सीस यांच्याविरुद्ध फसवणुकीच्या गुन्हासह माहिती तंत्रज्ञान सुधारणा अधिनियमानुसार गुन्हा नोंदविला आहे.
ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांत वाढ
जिल्हयात गत काही दिवसात ऑनलाईन फसवणुकीच्या घटनात वाढ झाली आहे. मोबाईलवर बक्षिसाचे आमिष देऊन फसवणुक केली जाते. अनेकदा वाहन खरेदीतही फसवणुक केली जाते. जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यात अशा तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. तर काहींना एटीएम कार्ड बंद असल्याचे सांगुन खात्यातील संपुर्ण पैसा वळता करण्याच्याही घटना घडल्या आहेत. नागरिकांनी अशा बक्षिसांच्या आमीषाला बळी पडु नये असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.