संगमबेटावर हातभट्टी दारू कारखाना उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2024 05:00 AM2024-03-04T05:00:00+5:302024-03-04T05:00:02+5:30
जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत संगम बेटावर अवैध दारू गाळली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे जयवंत चव्हाण यांना मिळाली. त्यांनी नवनियुक्त पोलीस उपनिरीक्षक रवींद्र रेवतकर यांच्यावर धाड टाकण्याची जबाबदारी सोपविली. मात्र, या बेटावर जाण्यासाठी पट्टीचे पोहणारे कर्मचारी हवे होते. पोलीस नायक सतीश देशमुख हे नदीच्या किनाऱ्यावर ठेवलेली नाव आणण्यासाठी पोहत गेले आणि त्या नावेत बसून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संगम बेटावर धाड मारली.
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : निर्जन आणि चोहोबाजूने पाण्याने वेढलेल्या संगम बेटावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून हातभट्टी दारू कारखाना बुधवारी उद्ध्वस्त केला. ९०० लिटर हातभट्टी दारूसह १०० किलो मोहामाच, २२७ प्लास्टिक व मातीचे मडके असा ६ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली. जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत संगम बेटावर अवैध दारू गाळली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे जयवंत चव्हाण यांना मिळाली. त्यांनी नवनियुक्त पोलीस उपनिरीक्षक रवींद्र रेवतकर यांच्यावर धाड टाकण्याची जबाबदारी सोपविली. मात्र, या बेटावर जाण्यासाठी पट्टीचे पोहणारे कर्मचारी हवे होते. पोलीस नायक सतीश देशमुख हे नदीच्या किनाऱ्यावर ठेवलेली नाव आणण्यासाठी पोहत गेले आणि त्या नावेत बसून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संगम बेटावर धाड मारली. तेथील दृष्य पाहून पथक अचंबित झाले.
या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गावठी दारू गाळत असल्याचे दिसून आले. २२७ प्लास्टिक व मातीच्या मडक्यात १०० किलो सडवा मोहामाच, ९०० लिटर हातभट्टीची दारू आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. यावेळी जितेंद्र रणभीड मेश्राम (वय ३७, रा.संगम पुनर्वसन) याला अटक करण्यात आली.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण, उपनिरीक्षक रवींद्र रेवतकर, धर्मेंद्र बोरकर, सतीश देशमुख, राजू दोनोडे, प्रशांत कुरंजेकर, सचिन देशमुख यांनी केली.
पोलिसांच्या या कारवाईने जिल्ह्यातील दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.
धाड टाकण्यासाठी पोलीस गेले वैनगंगा पोहून
भंडारा तालुक्यातील संगमबेटावर बुधवारी पोलिसांनी अवैध दारू कारखाना उद्ध्वस्त केला. मात्र, या बेटावर पोहोचणे पोलिसांसाठी मोठे दिव्य होते. निर्जन असे हे बेट चारही बाजूने पाण्याने वेढलेले आहे. तेथे पोहोचण्यासाठी बोटीशिवाय किंवा पट्टीच्या पोहणाऱ्याशिवाय पर्याय नाही. पोलिसांकडे कोणतीही बोट नव्हती. मात्र, पैलतिरावर एक बोट दिसताच पोलीस नायक सतीश देशमुख पोहून गेले आणि त्यांनी नाव आणून इतर पोलिसांना संगम बेटावर पोहोचविले. ही धाडसी कारवाई करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी कौतुक केले.