‘दिल्या घरी सुखी राहा’, बोलून घेतला जगाचा निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 10:11 PM2019-04-29T22:11:13+5:302019-04-29T22:11:42+5:30
लग्नसोहळा थाटामाटात पार पडल्यानंतर मुलीला दिल्या घरी सुखी राहण्याचा आशीर्वाद देऊन निरोप दिला आणि त्यानंतर मांडववाढणीच्या दिवशी वधूपित्याने जगाचा निरोप घेतल्याची हृदयदायक घटना रविवारला विरली बु. येथे घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
विरली (बु.) : लग्नसोहळा थाटामाटात पार पडल्यानंतर मुलीला दिल्या घरी सुखी राहण्याचा आशीर्वाद देऊन निरोप दिला आणि त्यानंतर मांडववाढणीच्या दिवशी वधूपित्याने जगाचा निरोप घेतल्याची हृदयदायक घटना रविवारला विरली बु. येथे घडली. या घटनेमुळे लग्नसोहळ्याच्या आनंदावर काळाने विरजन घातले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेतील मृताचे नाव पुरूषोत्तम भिकाजी बन्सोड (४८) रा. विरली बु असे आहे. बन्सोड यांच्या प्राजक्ता नामक मुलीचे चकारा येथील कुणाल खोब्रागडे यांच्याशी शुक्रवारला शुभमंगल पार पडले. विवाहसोहळ्यानंतर बन्सोड यांनी मुलीला, ‘बेटा दिल्या घरी सुखी राहा’, असे बोलून तिला निरोप दिला होता.
वराकडील स्वागत समारंभ सोहळा आटोपल्यानंतर रविवारला मांडव वाढणीसाठी नवदाम्पत्य विरली बु. येथे आले होते. वधूमंडपी लग्नसमारंभाच्या या समारोपीय कार्यक्रमाची लगबग सुरू असतानाच दुपारी वधूपित्याची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तातडीने पवनी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना त्यांच्यावर वाटेतच काळाने झडप घातली. त्यांचा मृत्यूमुळे वधूच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. आनंददायी लग्नसोहळ्याचे वातावरण अचानक दु:खात परावर्तित झाले.
कुणीही अशी कल्पनाही केली नसावी असा हा प्रसंग विरली वासीयांच्या स्मरणात कायम कोरला गेला.
स्थानिक स्मशानभूमीत रविवारला सायंकाळी उशीरा बन्सोड यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नववधू प्राजक्ताचे अश्रू अनावर झाले होते. ‘बाबा सोडून गेले,’ हेच एकमेव वाक्य तिच्या मुखी होते. बन्सोड यांच्या मागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा आणि बराच मोठा आप्त परिवार आहे.