पावसाचा कहर, हलका धान धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2022 10:28 PM2022-10-11T22:28:52+5:302022-10-11T22:29:28+5:30
भंडारा जिल्ह्यात सुरुवातीला यंदा समाधानकारक पाऊस कोसळला. या पावसाने धान पीक चांगले बहरून आले. सतत कोसळत असलेल्या पावसाने किडींचे प्रमाणही घटले. ओलितासाठी शेतकऱ्यांना प्रकल्पाच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळही आली नाही. यंदा धानाचे अपेक्षेपेक्षा अधिक पीक होईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, निसर्गाने पुन्हा यावर पाणी फेरले. गत आठ दिवसांपासून जिल्ह्यात परतीचा पाऊस सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कधी नव्हे, ते यंदा धानाचे बंपर पीक हाती येण्याची अपेक्षा असताना पाऊस त्यावर पाणी फेरत आहे. गत आठवडाभरापासून जिल्ह्यात पाऊस कोसळत असून, सोमवारपासून तर सर्वदूर पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे काढणीला आलेला हलका धान धोक्यात आला आहे. हाताशी आलेला घास निसर्ग हिरावून तर नेणार नाही ना, अशी धास्ती शेतकऱ्यांना आहे.
भंडारा जिल्ह्यात सुरुवातीला यंदा समाधानकारक पाऊस कोसळला. या पावसाने धान पीक चांगले बहरून आले. सतत कोसळत असलेल्या पावसाने किडींचे प्रमाणही घटले. ओलितासाठी शेतकऱ्यांना प्रकल्पाच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळही आली नाही. यंदा धानाचे अपेक्षेपेक्षा अधिक पीक होईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, निसर्गाने पुन्हा यावर पाणी फेरले. गत आठ दिवसांपासून जिल्ह्यात परतीचा पाऊस सुरू आहे. सोमवारपासून तर जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस बरसत आहे. गत २४ तासांत जिल्ह्यात १६.६ मिमी पावसाची नोंद झाली.
त्यात भंडारा १९.२ मिमी, मोहाडी २०.२ मिमी, तुमसर ३६.२ मिमी, पवनी २.६ मिमी, साकोली ३.२ मिमी, लाखांदूर १४.४ मिमी आणि लाखनी तालुक्यात २०.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ११७ टक्के पाऊस कोसळला आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ११६४.७ मिमी असून, आतापर्यंत जिल्ह्यात १५९१.४ मिमी पाऊस कोसळला आहे.
तीन दिवस येलो अलर्ट
हवामान खात्याने भंडारा जिल्ह्यासाठी ११ ते १३ ऑक्टोबर या तीन दिवसांसाठी येलो अलर्ट दिला आहे. मंगळवारी सकाळी ७.३० वाजतापासून जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस बरसला. दुपारी ३ वाजेपर्यंत पाऊस कोसळत होता. जिल्ह्यातील साकोली, तुमसर, भंडारा, मोहाडी, पवनी, लाखांदूर आणि लाखनी तालुक्यात हा पाऊस कोसळला आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले.
बावनथडीचे चार तर गोसेचे दोन गेट उघडले
- जिल्ह्यात सर्वत्र पाऊस कोसळत असल्याने, प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात जलसाठा झाला आहे. सध्या गोसेखुर्द प्रकल्पात ७१.६८ टक्के जलसाठा असून, या प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहे. बावनथडी प्रकल्प १०० टक्के भरला असून, मंगळवारी चार दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर गोंदिया जिल्ह्यातील धापेवाडा प्रकल्पाचे तीन दरवाजे उघडले आहे. यासोबतच संजय सरोवरमध्ये ९६.१४ मिमी, पुजारीटोला प्रकल्पात ९३.४३ मिमी जलसाठा आहे.