‘तो’ पूल वाहतुकीसाठी धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 05:00 AM2020-09-07T05:00:00+5:302020-09-07T05:00:50+5:30
सदर पुलाच्या देखभाल दुरुस्तीचे काम मोहाडी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. दरवर्षीच पावसाळा आला की, पुलावरील डांबर उखडले जाते हे सर्वश्रुत आहे. त्यासाठी शासनाकडून दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपयांची उचल होते. मात्र काम प्रत्यक्षात दिसत नाही. यावर्षी नाही तर दुसऱ्या वर्षी करू हे धोरणच बांधकाम विभाग राबवित असल्याने नागरिक संतापले आहेत. आज घडीला माडगी पुलावर एक दोन नव्हे मोठे खड्डे पडून माडगी पुलाची चाळण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : वैनगंगेच्या विस्तीर्ण पात्र असलेल्या माडगी येथील मोठ्या पुलावर खड्डे पडल्याने पुलावरून जाताना दुचाकी चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. रस्त्याचे बांधकाम काही दशकांपूर्वी करण्यात आले खरे मात्र त्या पुलाच्या देखरेखीअभावी पुलाला मोठमोठे खड्डे पडले आहेत. परिणामी पुलावरून जाताना दुचाकी चालकांना जीव धोक्यात घालून जावे लागते. येथे अनेकदा या ठिकाणी अपघातही झाले आहेत. सुदैवाने पुलावर कठडे आहेत मात्र अतिवेगाने येणारे वाहन एखाद्या वेळी पुलाचे कठडे तोडून वाहनासह वाहनचालकांना जलसमाधी मिळू शकते. अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली असतांना देखील सार्वजनिक विभागाने गांधारीची भूमिका घेतल्याने नागरिकामधून संताप व्यक्त होत आहे.
तुमसर- गोंदिया- रामटेक- नागपूर - गोंदिया महामार्गावरील वैनगंगा नदीवर माडगी येथे दळणवळणाच्या साधनासाठी वैनगंगा नदीवर मोठया पुलाची निर्मिती करण्यात आली आहे.
सदर पुलाच्या देखभाल दुरुस्तीचे काम मोहाडी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. दरवर्षीच पावसाळा आला की, पुलावरील डांबर उखडले जाते हे सर्वश्रुत आहे. त्यासाठी शासनाकडून दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपयांची उचल होते. मात्र काम प्रत्यक्षात दिसत नाही. यावर्षी नाही तर दुसऱ्या वर्षी करू हे धोरणच बांधकाम विभाग राबवित असल्याने नागरिक संतापले आहेत. आज घडीला माडगी पुलावर एक दोन नव्हे मोठे खड्डे पडून माडगी पुलाची चाळण झाली आहे. पावसाळ्यात खड्यात पाणी साचत असल्याने खड्डे दिसत नाहित. त्यामुळे वाहन चालक या खड्ड्यातून वाहन नेताच वाहनाचे नियंत्रण सुटण्याची भिती व्यक्तहोत आहे. चालकाचे स्टेरिंग वरून नियंत्रण सुटत असल्याने अनेकदा वाहन पुलावरील कठड्यावर आदळले. अनेकदा वाहनाचा वेग कमी असल्यामुळे बरेचदा वाहने जागेवरच बंद पडतात. एखादया वेळेस तरी वाहन धारकांची होणारी कसरत पाहण्यासाठी अधिकाऱ्यांनी पाहणी करण्याची गरज आहे.
पुलावरील कठडे तोडून वाहनासह चालक नदीत कोसळण्याची भिती आहे. भरदिवसा अशी परिस्थिती येत असल्याने रात्रीचा विचार न केलेलाच बराअसे वाहनधारकांनी सांगितले. तुमसर-गोंदिया मार्गावर तिरोडा येथे विद्युत प्रकल्प आहे तर देव्हाडी येथे मोठे रेल्वे जंक्शन आहे. याचमार्गावरून मध्यप्रदेश, छत्तीसगढ येथे जाण्यासाठी हा मार्ग सोयीचा असल्याने या मार्गावर दिवस रात्र वाहनांची नेहमीच वर्दळ असते. सार्वजनिक बांधकाम विभागाची भूमिका संशयास्पद असून याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज आहे.
माडगी येथील पुलावरून प्रवास करताना एखाद्या दिवशी अपघात होत नाही असा कोणताच दिवस उगवला नाही. अनेक निवेदने देण्यात आली मात्र याकडे बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष केले जाते.परिस्थितीची गंभीरता लक्षात घेवून बांधकाम मंत्र्यांना निवेदन दिले आहे.
- गौरीशंकर मोटघरे,
महासचिव जिल्हा काँग्रेस