घरात वडिलांचे पार्थिव, अन् त्याने अश्रू थोपवून दिला बारावीचा पेपर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2022 01:14 PM2022-04-08T13:14:45+5:302022-04-08T15:35:46+5:30
पेपर संपताच त्याने दुपारी गाव गाठून वडलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले अन् अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
साकोली (भंडारा) : बारावीचा शेवटचा पेपर गुरुवारी असल्याने तो बुधवारीच काकाकडे साकोलीत आला. मराठीच्या पेपरचा अभ्यास करत असताना रात्री ११ वाजता वडलांच्या निधनाचा निरोप आला. डोळ्यांपुढे वडील दिसत होते. अभ्यासतही मन लागत नव्हते. अशा परिस्थितीतही त्याने काळजावर दगड ठेवत पेपर सोडविण्याचा निर्णय घेता. पेपर संपताच दुपारी गाव गाठून वडलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले अन् धाय मोकलून रडला.
प्रणीत सुभाष कऱ्हाडे असे या विद्यार्थ्याचे नाव असून, तो देवरी तालुक्यातील मोहोगावचा रहिवासी आहे. काका जयेंद्रकुमार कऱ्हाडे यांच्याकडे राहून तो साकोलीच्या कृष्णमुरारी कटकवार विद्यालयात बाराव्या वर्गात शिकत आहे. पेपर दरम्यान सुटी असल्याने तो आपल्या मूळगावी मोहोगाव येथे गेला होता. दोन दिवसांपूर्वी वडील सुभाष कराडे (४६) यांची तब्येत अचानक खालावली. स्वतः प्रणीतने वडिलांना उपचारासाठी गोंदिया येथे नेले होते. उपाचार केल्यानंतर कोणातही धोका नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे प्रणीत निर्धास्त झाला.
डॉक्टरांच्या परवानगीनंतर वडील सुभाष यांना बुधवारी घरी आणले. त्याच दिवशी सायंकाळी तो घरच्यांचा निरोप घेऊन साकोलीकडे निघाला. काकाच्या घरी पोहचला. दुसऱ्या दिवशी असलेल्या मराठीच्या पेपरची तयारी सुरू केली. मात्र, रात्री ११ वाजता वडलांच्या निधनाचा निरोप आला. त्याच्या पायाखालची वाळूच सरकली. वडलांचे पार्थिव अन् आपण साकोलीत काय करावे, असा प्रश्न त्याच्यापुढे पडला. काही क्षणात त्याने काळजावर दगड ठेवत पेपर देण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी आसवांना थोपवून मराठीचा पेपर लिहिला. परीक्षा होताच त्याने आपले गाव गाठले. घरी पोहोचताच वडलांचे पार्थिव पाहून हंबरडा फोडला. दुपारी प्रणीतने वडलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.
वडिलांना खरी श्रद्धांजली
प्रणीत हा सुरुवातीपासूनच हुशार मुलगा आहे. वडिांचा अत्यंत लाडका आणि समजूतदार मुलगा म्हणून ओळखला जातो. वडील नेहमी त्याला अभ्यासासाठी प्रोत्साहित करायचे. वडिलांचा शब्द त्याच्यासाठी प्रमाण होता. बारावीचे वर्ष महत्वाचे असल्याने तो साकोली येथे आपल्या काकांंकडे राहुन शिक्षण घेत होता. परीक्षेच्या आदल्या दिवशी त्याच्या वडिलांचे निधन झाले. प्रणीतने याही परिस्थितीत परीक्षा देऊन वडिलांना श्रद्धांजली अर्पण केली.