महिन्याभरापूर्वी लग्न झालेल्या पत्नीला जंगलात नेले.. डोळे बंद करायला सांगितले... आणि 'हे' अघटित घडले...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 12:58 PM2021-08-18T12:58:13+5:302021-08-18T12:59:57+5:30
Bhandara News महिन्याभरापूर्वी लग्न झालेल्या पत्नीवर चाकूने हल्ला करून, तिला गंभीर जखमी करण्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील साकोली तालुक्यातील मोहघाट जंगलात घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : महिन्याभरापूर्वी लग्न झालेल्या पत्नीवर चाकूने हल्ला करून, तिला गंभीर जखमी करण्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील साकोली तालुक्यातील मोहघाट जंगलात घडली. या प्रकरणी पतीला अटक करून त्याची पोलीस कोठडी घेण्यात आली.
पूनम गीतेश आंबागडे (२४) रा.चिंचोली ता.मौदी असे जखमी महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पती गीतेश चिंतामण आंबागडे (२९) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली. महिन्याभरापूर्वी गीतेशने पहिल्या पतीपासून वेगळे राहणा?्या पूनमसोबत लग्न केले होते. मात्र, काही दिवसांतच त्यांच्यात खटके उडायला लागले.
१५ ऑगस्ट रोजी ते साकोलीमार्गे रायपूरला जाण्यासाठी दुचाकीने निघाले. साकोली तालुक्यातील मोहघाट जंगलात मोटारसायकल थांबविली. गीतेशने पत्नीला डोळे बंद करण्यास सांगितले, पतीवर विश्वास ठेवत तीने डोळे बंद केले आणि काही कळायचा आत तिच्या मानेवर डाव्या आणि उजव्या बाजूला चाकूने वार केले. जंगलात कुणीही नसल्याने आरडाओरडा करूनही उपयोग झाला नाही.
पतीच्या तावडीतून सुटका करून पूनमने साकोली गाठले. रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली. या घटनेची तक्रार साकोली ठाण्यात देण्यात आली. त्यावरून पोलिसांनी तत्काळ पती गीतेश आंबागडे याला अटक केली. न्यायालयापुढे हजर केले असता, दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक खोब्रागडे करीत आहेत.