मुख्याध्यापक-शिक्षकांची विद्यार्थी शोधमोहिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 10:20 PM2018-04-25T22:20:52+5:302018-04-25T22:20:52+5:30

इयत्ता पहिली ते बारावीचे वर्ग असलेल्या सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षक त्यांची नोकरी टिकवून ठेवण्यासाठी विद्यार्थी शोधमोहिमेत व्यस्त झालेले आहेत.

Headmaster-teacher's student search | मुख्याध्यापक-शिक्षकांची विद्यार्थी शोधमोहिम

मुख्याध्यापक-शिक्षकांची विद्यार्थी शोधमोहिम

googlenewsNext
ठळक मुद्देसमग्र शिक्षा अभियानात गुंतवू नका : नोकरी टिकवून ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांना आमिष

अशोक पारधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : इयत्ता पहिली ते बारावीचे वर्ग असलेल्या सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षक त्यांची नोकरी टिकवून ठेवण्यासाठी विद्यार्थी शोधमोहिमेत व्यस्त झालेले आहेत. अशावेळी केंद्र पुरस्कृत समग्र शिक्षा अभियानाचे निर्मितीसाठी एसडीएमआयएस या प्रणालीत आॅनलाईन माहिती भरण्याचे काम मुख्याध्यापक शिक्षकांना देण्यात आलेले आहे. विद्यार्थ्यांचा निकाल व विद्यार्थी शोध मोहिम यात अडथळा येवू नये, यासाठी समग्र शिक्षा अभियानात त्यांना गुंतविण्यात येवू नये, अशी शिक्षणक्षेत्रात बोलले जात आहे.
प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिकचे वर्ग असलेल्या शाळांना शासनाचे प्रयोगाचे केंद्र बनविले आहे. शासन बदलले की प्रयोगही बदलत आहेत. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासापेक्षा त्यांची व त्यांचे कुटुंबियांची माहिती शाळामार्फत संकलीत करण्यासाठी वर्ष कमी पडत आहे. सर्व शिक्षा अभियान व राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान अंतर्गत योग्य पद्धतीने काम सुरू असताना नवीन प्रयोग समग्र शिक्षा अभियान राबविण्यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहे. पाणी तेच बाटली तेवढी बदलने या उक्तीप्रमाणे ही प्रयोग असणार आहे. प्रयोग करण्यासाठी ही योग्य वेळ नाही, अशी चर्चा समग्र शिक्षण क्षेत्रात होत आहे. समग्र शिक्षा अभियानासाठी आवश्यक असलेली विद्यार्थ्यांची बरीचशी माहिती सरलच्या स्टुडेंट पोर्टलवर उपलब्ध आहे. शिक्षण विभागाने तीच माहिती केंद्र पुरस्कृत समग्र शिक्षा अभियान योजनेसाठी परस्पर हस्तांतर का करू नये, असा प्रश्न विचारला जात आहे.
इंग्रजी शाळांचा 'भूत' मराठी माध्यमाच्या शाळांच्या मानगुटीवर बसलेला असल्याने मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये काम करणारे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी स्वत:ची नोकरी टिकवून ठेवण्यासाठी प्रवेशास पात्र विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पोहचत आहे. त्यांना पुस्तके, नोटबुक, दप्तर, सायकल व प्रसंगी रोख रक्कम याचे आमिष देवून शाळेसाठी विद्यार्थी मिळविण्यासाठी उन्हातान्हात पायपीट करीत आहेत. एवढे करूनही कित्त्येक मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना शाळेमधून अतिरिक्त ठरविले जात आहे. सत्र संपायला आले तरीही अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात शिक्षण विभागाला यश आलेले नाही. सन २०१७-१८ ची संचमान्यता शाळांना प्राप्त झालेली नाही. समायोजन न झालेल्या कित्त्येक शिक्षकांना तीन चार महिने वेतनाशिवाय काम करावे लागत आहे. मराठी माध्यमाच्या शाळा व त्यात काम करणारे कर्मचारी यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहे. नोकर भरतीला परवानगी नाही. त्यामुळे शिक्षकांची व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची अनेक पद रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत कर्मचाºयांना अतिरिक्त काम करावे लागत आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी शाळांची संचमान्यता वेळेवर व्हावी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांचे समायोजन ठराविक वेळात पूर्ण करण्यात यावे, आवश्यकतेनुसार नोकर भरती करण्यात यावी व गरजेपेक्षा जास्त व अवेळी आॅनलाईन माहिती सादर करण्याची सक्ती करण्यात येवू नये, असा सूर आहे.

Web Title: Headmaster-teacher's student search

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.