मुख्याध्यापकाचा अपघाती मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 01:09 AM2018-03-16T01:09:07+5:302018-03-16T01:09:07+5:30
शाळा सिद्धी प्रशिक्षणासाठी मोहरणा येथून भंडाराकडे येणाऱ्या मुख्याध्यापकाच्या दुचाकीला विरूद्ध दिशेने भरधाव जाणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली.
ऑनलाईन लोकमत
भंडारा : शाळा सिद्धी प्रशिक्षणासाठी मोहरणा येथून भंडाराकडे येणाऱ्या मुख्याध्यापकाच्या दुचाकीला विरूद्ध दिशेने भरधाव जाणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. यात एका मुख्याध्यापकाचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीच्या मागे बसलेल्या दुसऱ्या मुख्याध्यापकांना गंभीररीत्या दुखापत झाली आहे. ही घटना गुरूवारला सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास राष्ट्रीयम महामार्गावरील कारधा पुलाजवळील पथकर नाक्याजवळ घडली.
रवींद्र शामराव ढोके (५७) असे मृत मुख्याध्यापकाचे नाव असून टिकाराम गणपत ठाकरे असे गंभीररित्या जखमी मुख्याध्यापकाचे नाव आहे. रविंद्र ढोके हे लाखांदूर तालुक्यातील मोहरणा येथील गोविंदप्रभू विद्यालयाचे मुख्याध्यापक होते.
भंडारा जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने भंडारा येथील आठवले समाजकार्य महाविद्यालयात शाळा सिध्दी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन गुरुवारला करण्यात आले होते. या प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी मुख्याध्यापक ढोके हे बेलाटी येथील गोविंदप्रभू विद्यालयाचे मुख्याध्यापक टिकाराम ठाकरे यांच्यासोबत दुचाकीने येत होते. दरम्यान भंडारा शहरालगतच्या कारधा टोलनाक्याजवळील वळणावर त्यांच्या दुचाकीला विरूद्ध दिशेने जाणाºया भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. यात ढोके यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. यात ठाकरे हे गंभीररित्या जखमी झाले. ठाकरे यांना गंभीर अवस्थेत भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले. याप्रकरणी कारधा पोलिसांनी ट्रकचालकाविरूद्ध गुन्हे दाखल केले असून तपास उपनिरीक्षक नान्हे हे करीत आहेत.
परीक्षा काळात शिक्षण विभागाचे प्रशिक्षण
शाळा सिद्धी प्रशिक्षण कार्यशाळा भंडारा येथील आठवले समाजकार्य महाविद्यालयात गुरुवारला १०.३० ते ५.३० पर्यंत आयोजित करण्यात आले होते. परीक्षांचे सत्र सुरू असल्यामुळे मुख्याध्यापक दहावी व बारावीच्या परीक्षेत व्यस्त आहेत. त्यात काही समीक्षक, काही परिक्षक, काही केंद्रसंचालक, उपकेंद्रचालक ही जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे. या कामात मुख्याध्यापक व्यस्त आहे. शिक्षण विभागाने परीक्षा कालावधीत मुख्याध्यापकांसाठी प्रशिक्षण ठेवणे गैरसोयीचे होते, असा सूर शिक्षक वर्गांमध्ये उमटत आहे. दरम्यान, प्रशिक्षण देणारे तज्ज्ञ मार्गदर्शक हे कार्यशाळा अनिवार्य असल्याचे सांगून ७.३० वाजतापर्यंत कुणालाही प्रशिक्षणातून जाता येणार नाही, अशी तंबी मुख्याध्यापकांना देण्यात आल्यामुळे यात सहभागी होण्यासाठी मुख्याध्यापकांची तारांबळ उडत होती. प्रशिक्षणाचा भार मुख्याध्यापकावर आणून ताणतणावात ठेवण्यात आल्याचा आरोप आता समाजमाध्यमातून समोर आला आहे.